लखनऊ - महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात खून झाला होता. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) शनिवारी आरोपी इरफान सोनू शेख मन्सूरी उर्फ राजधनियाला लखनऊ येथून अटक केली.
महाराष्ट्रातील ठाणे येथे 24 नोव्हेंबर 2020 रोजी मनसेच्या नेत्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. गोरखपूर जिल्ह्याच्या गुलरिहा पोलीस ठाणे परिसरातील खेरिया येथील रहिवासी इरफान सोनूने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी सोनूला अटक करण्यात आली आहे. 23 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ओसामा नावाच्या व्यक्तीने जमील अहमद शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती. हत्येसाठी दोन लाख रुपये मिळाल्याचे त्याने सांगितले. ही हत्या राकांपा नेत्याच्या सांगण्यावरून केल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे.
अटक केलेल्या आरोपींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून 24 नोव्हेंबर रोजी दुपारी जमील हे मोटारसायकलवरून जात होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते.
हेही वाचा - नजरचूक! हा तर 'धक्कादायक विनोद' म्हणावा लागेल