पणजी- मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र गोमंतक पक्ष राज्यातील प्रत्येक पक्षासोबत युतीसाठी धडपडत आहे. त्यात काँग्रेसने पितृपक्षांतरही युतीची दारे अद्याप न उघडल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा सोबत जाण्यासाठी महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत गुप्तपणे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत भाजपसोबत युतीची तडजोड करण्यात आली आहे. मंगळवारी विधानसभा सभागृहाबाहेर ढवळीकर यांनी आपण आगामी विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत एकत्र असल्याचा खुलासा करत आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
राज्यातील अनेक पक्षांचे नेते माझ्या भेटीला येत आहेत. कोणत्याच पक्षाला माझ्या घराचे दरवाजे बंद नाहीत, मात्र भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचा आपण विचार करत असून आगामी विधानसभेत मी आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत एकत्र असणार असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान विधानसभेबाहेर सुदिन ढवळीकर माध्यमांशी बोलत असताना त्यांच्या पाठीमागून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत सभागृहाबाहेर पडले, त्याचवेळी पत्रकारांनी सावंत आणि ढवळीकर यांना एकाच कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये बसवीत आगामी युतीबाबत प्रश्न विचारला असता, दोघाही नेत्यांनी हसतच सकारात्मकता दर्शवित याबाबत बोलणे टाळले.
महाराष्ट्र गोमंतक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई-
१९६१ साली पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन गोवा राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोवा राज्याचे पाहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे त्यांचा वारसा त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर यांनी चालविला. स्वातंत्र्यांतर पुढे १७ वर्षे म गो ने राज्य केले, ८० च्या दशकात राज्यात काँग्रेस पक्ष वाढू लागल्यानंतर या पक्षाला राज्यात उतरती कळा लागली. मात्र तरीही एकेरी आमदार निवडून येणाऱ्या म गो ने मागच्या दोन दशकात विविध पक्षांसोबत युती करत सत्तेत आपले स्थान बळकट करून ठेवले होते.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र गोमंतक या पक्षाचे जेमतेम 3 आमदार निवडून आले. त्यापैकी बाबू आजगावकर व दीपक पावसकर यांनी २०१९ पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला. आजगावकर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तर पावसकर सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यामुळे उरलेले एकमेव आमदार सुदिन ढवळीकर विधानसभेत पक्षाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे राज्यातील एकेकाळचा सत्ताधारी असलेल्या महाराष्ट्र गोमंतक पक्षाची अवस्था राज्यातील एकमेव आमदार असणारा पक्ष अशी ओळख निर्माण झाली आहे.
हेही वाचा - गोव्यातील पक्ष सोडणाऱ्या आणि पक्षात घेणाऱ्या दोघांनाही लाज नाही; ही जनतेची फसवणूक- संजय राऊत
हेही वाचा - गोवा विधानसभा निवडणूक : काँग्रेस आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पितृपक्षानंतर होणार मोठ्या घडामोडी