चेन्नई - मद्रास उच्च न्यायालयाने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (सीआयआय) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांना नोटीस पाठवली आहे. कोरोनावरील कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीला काही शारीरिक त्रास उद्भवला होता. त्याबाबत एकाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरून कोरोना रोखण्यासाठी देण्यात आलेली ही लस सुरक्षित आहे की नाही, हे स्पष्ट करावे, अशी विचारणा नोटीसीद्वारे न्यायालयाने शुक्रवारी केली.
गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरला याचिकाकर्त्याने कोरोनाची लस घेतली होती. 10 दिवसानंतर त्यांना डोकेदुखी आणि काही इतर त्रास झाला. त्यांना उपचारासाठी 16 दिवस रुग्णालयातही रहावे लागले होते. याचिकाकर्त्याने नुकसान भरपाई म्हणून पाच कोटींची मागणी केली आहे. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश अब्दुल कुटोस यांनी सध्या सुनावणी तहकूब केली असून औषध नियामकांसह केंद्रीय आरोग्य विभागाला या याचिकेवर 26 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.