नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीविरूद्ध लढा देण्यासाठी इतर देशांना मदत करण्यासाठी 'व्हॅक्सीन मैत्री' उपक्रम सुरू ठेवत भारताने स्वदेशी बनावटीची लस आफ्रिकेतील सोमालिया देशाला शनिवारी पाठवली. याबाबतची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
'भारतीय लस हिंदी महासागराच्या पलीकडे पोहोचत आहे. मेड-इन-इंडिया लस सोमालियामध्ये पोहोचत आहे,' असे ट्विट जयशंकर यांनी केले आहे. 'व्हॅक्सीन मैत्री' या उपक्रमांतर्गत भारत आपल्या शेजारील आणि मित्र देशांना कोरोना विषाणूवरील लस पुरवत आहे.
भारताने जगातील पंचवीस राष्ट्रांना यापूर्वीच मेड-इन-इंडिया लस पुरवली आहे. येत्या काही दिवसांत युरोप, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन ते आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि पॅसिफिक बेटांपर्यंत आणखी एकोणचाळीस देशांना या लसीचा पुरवठा केला जाईल.