नवी दिल्ली - गेल्या 24 तासांमध्ये भारतात कोरोना विषाणूचे 9,102 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1,06,76,838 वर पोचला आहे. गेल्या सात महिन्यांमधील कोरोना रुग्णांची ही सर्वात कमी दैनंदिन नोंद असून 10 हजाराच्या खाली हा आकडा आला आहे. कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली.
गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 117 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 1,53,587 वर पोहचला. गेल्या 19 दिवसांपासून देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 20 हजारांपेक्षा कमी राहिली आहे. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही सतत कमी होत आहे. गेल्या 19 जानेवारीला 10,064 रुग्णांची नोंद झाली होती. तर जून महिन्यातील 3 तारखेला 9,633 रुग्णांची नोंद झाली होती.
मृत्यूदर 1.73 टक्के
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 1,03,45,985 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात सध्या 1,77,266 सक्रिय रुग्ण आहेत. आजारातून बरे होण्याचा दर 96.83 टक्के इतका असून मृत्यूदर 1.73 टक्के आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी 80 टक्के बाधित केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगड, गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांमध्ये आढळले आहेत.