नवी दिल्ली- महाराष्ट्रातील लोणार तलाव आणि आग्र्यातील सूर तलाव या दोन्ही तलावांची रामसार परिषदेतील ठरावानुसार पाणथळ क्षेत्र म्हणून निवड झाली आहे. आता हे दोन्ही तलाव आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाचे ठरले आहेत. अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
पाणथळ हे नैसर्गिक पाणी साठवणुकीचे ठिकाण असून ते पृथ्वीवरील सर्वात जास्त निर्मिती करणारे इकोसिस्टम आहे, अशी माहिती जावडेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.
काय आहे रामसार परिषद?
इराण मधील रामसार या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी एक परिषद भरवण्यात आली होती. जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करणे हा या परिषदेचा हेतू होता. त्यानुसार पाणथळ जागांबाबत या परिषदेत एक ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाल रामसार परिषद म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ पासून अमलात आला. भारताने १९८२ मध्ये हा ठराव स्विकारला.
स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून, तसेच आंतराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांचा योग्य वापर करणे व त्यातून जगाचा विकास साधने हे रामसार परिषदेचे ध्येय आहे.
हेही वाचा - 'काश्मिरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गुपकर अलायन्स मिळून लढणार'