मोदींच्या हस्ते 5G सेवेचा आज होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G सेवा सुरू करणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेस ( IMC 2022 ) कार्यक्रम सुरू होत आहे.
कार्ड टोकनायझेशन नियम लागू
डेबिट, क्रेडिट कार्डचे ऑन-फाइल टोकनायझेशन ( Card Tokenisation ) नियम आजपासून लागू होत आहे. ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्याची तयारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. हा नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित राहणार आहे.
शशी थरूर नागपूर दौऱ्यावर
नागपूर : काँग्रेसचे नेते, खासदार शशी थरूर आज दीक्षाभूमी स्मारकाला भेत देतील. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांचे नागपूर आगमन होणार आहे. सांयकाळी सहाच्या सुमारास त्यांची दीक्षाभूमी येथे पत्रकार परिषद होणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: खेळाडूंचे गुवाहाटीत दाखल, टीमचे भव्य स्वागत
India vs South Africa 2nd T20 Guwahati : भारत तसेच दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीत पोहोचली आहे. भारतीय खेळाडू लवकरच सरावाला सुरुवात करतील. याबाबत बीसीसीआयने टीम इंडियाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात भारतीय खेळाडूंचे स्वागत करताना दाखवण्यात आले आहे. दुसरा सामना 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 8 विकेटने जिंकला होता.
गॅसच्या किमती वाढण्याची शक्याता
नवी दिल्ली : ऑक्टोबर महिना सुरू होताच महागाईचा मोठा नागरिकांना धक्का बसला आहे. नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी 40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे वीजनिर्मिती, खत निर्मिती, वाहन चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या किमती वाढण्याची शक्याता आहे.
देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी नागपुरात आगमन झाले. आज ते हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्ह्यात जाणार असून तिथल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होतील. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार आहे. सायंकाळी परत ते नागपुरात दाखल होतील.
मुंबईत आजपासून रिक्षा भाडेवाड होणार
मुंबईत आजपासून रिक्षा, टॅक्सीच्या दरामध्ये वाढ होणार आहे. रिक्षाच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ तर, टॅक्सीचे दर तीन रुपयांनी वाढतील.