बंगलोर (कर्नाटक): बंगळुरू विद्यापीठाच्या ज्ञानभारती कॅम्पसमध्ये बिबट्या आणि त्याची पिल्ले फिरत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यापार्श्वभूमीवर बंगळुरू विद्यापीठाने आपले विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये असे सांगितले होते. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने याठिकाणी पाहणी केली. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ जुना आणि दुसरीकडील असल्याचे स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाने जारी केला होता अलर्ट: व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विद्यापीठाने गुरुवारी यासंदर्भात नोटीस जारी केली होती. सकाळी काही लोकांना बिबट्या दिसला. त्यांनी ताबडतोब विद्यापीठाच्या प्रशासन विभागाला सूचित केले, केल्याचे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. आम्ही वसतिगृहातील रहिवाशांना रात्री उशिरा कॅम्पसमध्ये फिरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही वर्ग स्थगित केलेले नाहीत. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गटात फिरण्याची विनंती केली असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
विद्यार्थ्यांमध्ये होते घबराटीचे वातावरण: बिबट्या दिसल्याची चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठ प्रशासनाने परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान वनविभागाने बंगळुरू विद्यापीठात बिबट्याचा कोणताही पुरावा नसल्याचे आज सांगितले. आदल्या दिवशी विद्यापीठात बिबट्या आल्याची एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली होती. त्यानंतर विद्यापीठाने अलर्ट जारी करून विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सावध राहण्याचे आणि रात्री प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते.
वनविभागाचे अधिकारी म्हणाले: दरम्यान वनविभागाचे अधिकारी एस एस रविशंकर यांनी सांगितले की, कॅम्पसमध्ये बिबट्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा मिळून आलेला नाही. प्रत्यक्ष पुरावा म्हणजे सीसीटीव्ही किंवा व्हिडीओद्वारे कॅप्चर केलेला प्राणी, आणि अप्रत्यक्ष पुरावा म्हणजे पगच्या खुणा किंवा विष्ठा आढळणे. आम्हाला दोन्हीपैकी कोणताही पुरावा सापडला नसल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या खुलाशानंतर आता विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
आधी आला होता संशय: गेल्या महिन्यात, बंगळुरूच्या दक्षिण भागातील काही भागात आणि कनकापुरा रोडजवळील तुराहल्ली जंगलात बिबट्याच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण होते. जवळच असलेल्या शहरातील बन्नेरघट्टा राखीव जंगलातून दोन बिबट्या तुराहल्ली जंगलात आणि आसपासच्या परिसरात घुसले असावेत, असा संशय वनाधिकाऱ्यांना त्यावेळी होता. बंगळुरू विद्यापीठाने त्यांचे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतःहून एक अलर्ट जारी केला. मात्र अलर्ट जारी करण्याच्या आधी त्यांनी वन विभागाशी चर्चा केली नसल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : देवळाली कॅम्प स्टेशनवाडी भागात बिबट्याच्या मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद