हैदराबाद Leaders Leaving Congress : माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभा खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. 2014 पासून काँग्रेसच्या अनेक युवा नेत्यांनी पक्ष सोडला आहे, जे एकेकाळी राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जायचे. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे नवीनतम नेते आहेत ज्यांनी पक्षाशी संबंध तोडले.
दिवंगत मुरली देवरा यांचे पुत्र : मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज दिवंगत मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. मुरली देवरा दक्षिण मुंबईतील प्रभावशाली नेते होते. मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून खासदार राहिले आहेत. 2012-14 या काळात ते केंद्रात दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री होते. जानेवारी 2022 मध्ये माजी केंद्रीय मंत्री रतनजीत प्रताप नारायण सिंह यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि भारतीय जनता पार्टीत सामिल झाले. ते 2009 मध्ये कुशीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
ज्योतिरादित्य सिंधियांनी साथ सोडली : नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पक्ष सोडणारे राहुल गांधींच्या जवळचे आणखी एक नेते म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया. ते सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत. मध्य प्रदेशच्या सिंधियांनी 2020 मध्ये काँग्रेस पक्ष सोडत भाजपामध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. सिंधिया यांनी राज्यात भाजपाची सत्ता टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अनिल अँटनींनीही पक्ष सोडला : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनीही पक्ष सोडला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. अँटनी हे मूळचे केरळचे असून केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते पियुष गोयल यांनी त्यांना भाजपात प्रवेश दिला होता. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनीही पक्षाला रामराम ठोकला. ते सध्या भाजपामध्ये आहेत.
हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला रामराम : गुजरातमधील काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांनीही पक्ष सोडला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ते गांधीनगर दक्षिण मतदारसंघातून विजयी झाले. गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनीही काँग्रेसची साथ सोडली. याशिवाय पंजाबमधील माजी केंद्रीय मंत्री अश्वनी कुमारी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहिलेले सुनील जाखड यांनीही पक्ष सोडला आहे.
हे वाचलंत का :