कोलकाता : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश प्राप्त झाले आहे. एनआयएच्या कोलकाता ब्रँचने कारवाई करत कर्नाटकातून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी पश्चिम बंगालमधल्या हनीट्रॅप प्रकरणातील तानिया प्रवीणच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
एनआयएने मंगळवारी कारवाई करत, कर्नाटकच्या सिर्सीमधून सय्यद इद्रिस या तरुणाला अटक केली होती. पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला चौकशीसाठी पश्चिम बंगालला नेण्यात आले. यानंतर तो लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले.
तानिया प्रवीण हनीट्रॅप प्रकरण..
यावर्षी १९ मार्चला पश्चिम बंगालच्या बदुरियामधून तानिया प्रवीण या २३ वर्षीय मुलीला अटक करण्यात आली होती. अकरावीत शिकणारी तानिया डार्क वेबचा वापर करत होती. तिच्याकडून एक डायरी, दोन मोबाईल, दोन सिमकार्ड, काही महत्त्वाच्या व्यक्तींचे फोटो आणि फोन नंबर असे साहित्य जप्त करण्यात आले होते. ती वेळोवेळी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात राहत असल्याचेही समोर आले होते.
यानंतर या विशेष पथकाने या घटनेचे गांभीर्य ओळखत हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले होते. यानंतर तिला ताब्यात घेत एनआयएने तिची चौकशी केली. त्यानंतर तिचे लष्कर-ए-तोयबाशी असलेले संबंध समोर आले. या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. तसेच, देशातून आणखी दहशतवादी भरती करण्याचे कामही तिच्याकडे देण्यात आले होते.
कर्नाटक कनेक्शन..
तानियाच्या मोबाईलची तपासणी केल्यावर तपास पथकाला कर्नाटकमधील सय्यद इद्रिसबाबत माहिती मिळाली होती. यानंतर त्याला एनआयएने तीन वेळा चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तानिया आणि दहशतवादी संघटना यांच्यामधील दुवा सय्यद असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीने चौकशी करण्यासाठी त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; अंतरिम जामीन देण्याचे आदेश