लक्षद्वीप : लक्षद्वीप कोर्टाने बुधवारी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कवरत्ती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 2009 मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला, असे या प्रकरणाशी संबंधित वकिलांनी सांगितले आहे.
आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देणार : वकिलांच्या म्हणण्यानुसार, माजी केंद्रीय मंत्री पी.एम. सईदचे जावई पदनाथ सालीह 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका राजकीय मुद्द्यावर हस्तक्षेप करण्यासाठी त्यांच्या जवळ पोहोचले तेव्हा त्यांच्यावर खासदार फैजल आणि इतर आरोपींनी हल्ला केला होता. या आदेशाला मोहम्मद फैजल उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. यावेळी बोलताना खासदार मोहम्मद फैजल यांनी ही बाब राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. या आदेशाला लवकरच उच्च न्यायालयात अपील करून आव्हान देणार असल्याचे खासदार मोहम्मद फैजल यांनी सांगितले.
कोण आहेत खासदार मोहम्मद फैजल? : मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते 2014 मध्ये लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातून 16 व्या लोकसभेवर खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2014-2016 या कालावधीत ते परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीविषयक स्थायी समिती आणि गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते.
2019 मध्ये पुन्हा खासदार म्हणून निवडून आले : त्यानंतर मे 2019 मध्ये, मोहम्मद फैजल 17 व्या लोकसभेसाठी पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. ते कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्यायविषयक स्थायी समितीचे सदस्य आहेत. याशिवाय, 13 सप्टेंबर 2019 रोजी ते अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्यही बनले. मोहम्मद फैजल यांचा जन्म 28 मे 1975 रोजी झाला आहे.