कुल्लू - हिमाचल प्रदेशातील पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनाली शहरात पर्यटाकांचा ओघ वाढला आहे. पर्यटकांची वाढती संख्या पाहता पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था कडक केली आहे. पर्यटनस्थळी दंगा मस्ती करत नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करत हिमाचल पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनाली मध्ये नुकताच सुरू झालेला अटल बोगदा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू झाला आहे. या बोगद्यातून अनेक पर्यटक प्रवास करून आनंद लूटत आहेत. मात्र, काही हुल्लडबाज पर्यटकांमुळे या बोगद्यातील वाहतुकीवर परिणाम झाल्याचा प्रकार समोर आला होता. याची माहिती मिळताच हिमाचल पोलिसांनी २ वाहनांतील तब्बल १५ पर्यटकांना ताब्यात घेतले आहे. तर ८ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करत ४० हजार रुपये वसूल केले आहेत.
कोरोनाचे नियम मोडले-
रविवारी अटल बोगद्यामध्ये आलेल्या काही पर्यटकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच कोरोना नियमाचे उल्लंघनही केल्याचा प्रकार समोर आला. याबाबतची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांन तत्काळ त्या पर्यटकांच्या २ वाहनाना ताब्यात घेतले. त्यापैकी १५ पर्यटक दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर 8 जणांना 40 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अटल टनलमधून 5 हजार वाहनांचा एकाच दिवशी प्रवास
सध्या हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे रविवार पर्यटकांचा ओघ वाढला आहे. तसेच मनाली मध्ये रोहतांग येथील अटल टनल हा पर्यटकांसाठी आकर्षणचा केंद्र बिंदू ठरला आहे. त्यामुळे या बोगद्यामधून रविवारी तब्बल ५ हजार ४५० वाहने धावल्याची नोंद झाली आहे. पोलिसांकडून या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार याबाबत नियोजन केले जात आहे.