हैदराबाद : बजेट म्हटले की सर्वसामान्य नोकरदारांना सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतो तो म्हणजे टॅक्स किती लागणार. सध्या किती उत्पन्नावर किती टॅक्स आहे. बजेटमधील टॅक्स सवलीतीची काय घोषणा आहे का. त्याचा आपल्याला काही फायदा होणार का. नवीन बजेटमध्ये झालेल्या घोषणेचा नेमका अर्थ काय. त्यानुसार ही घोषणा फसवी आहे काय. तसे असेल तर नेमके काय फसवे आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण काय करायचे. अशा प्रश्नांची आपणच आपल्यावर सरबत्ती करतो.
टॅक्सबाबत प्रश्नांचे काहूर : तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पाहिजे का. तसे असेल तर तुम्ही नक्कीच योग्य ठिकाणी आला आहात. कारण आम्ही तुम्हाला याचीच संपूर्ण माहिती आता देणार आहोत. अगदी सोप्या शब्दात. तुम्हाला कळेल अशा भाषेत. कारण आम्ही इथे आपण जसा विचार करतो. त्याच शब्दांमध्ये बजेटमधील टॅक्स संदर्भातील तरतुदींची माहिती देणार आहोत.
टॅक्स संदर्भातील नेमकी घोषणा : आता बजेटमधील टॅक्ससंदर्भातील घोषणा काय आहे ते पाहूयात. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांच्या बजेट भाषणात अगदी स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आता कोणत्याही पगारदाराला त्याचा पगार 3 लाखापर्यंत असेल तर त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. यापूर्वी ही रक्कम 2 लाख 50 हजार एवढी होती. अर्थात यावर्षी त्यामध्ये थेट 50 हजार रुपयांची वाढ केली आहे.
नवीन करमाफी मर्यादा किती : बजेटमधील दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे, तर पूर्वी 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर त्याला करमाफी होती. आता ही उत्पन्न मर्यादा 7 लाख रुपयांच्यापर्यंत नेण्यात आली आहे. म्हणजे या उत्पन्न मर्यादेत तब्बल 2 लाख रुपयांनी वाढ केली आहे.
कोणती करप्रणाली स्वीकारावी : या सगळ्या सवलती जर तुम्ही नवीन टॅक्स प्रणालीचा स्वीकार करणार असे ठरवले तर तुम्हाला मिळतील. त्याचवेळी तुम्हाला जुनी कर प्रणाली स्वतःसाठी हवी असेल तर त्यानुसारही तुम्ही टॅक्समध्ये तुमच्या उत्पन्नावर वजावट मिळवू शकता. थोडक्यात नवीन कर प्रणाली स्वीकारायची की जुन्या कर प्रणालीप्रमाणे बचतीवर सवलती मिळवायच्या हे तुम्ही ठरवू शकणार आहात.
गॅनबाची मेख : आता एक गॅनबाची मेख असलेला महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा म्हणजे तुम्हाला जुनीच कर प्रणालाही पाहिजे असेल तर ते तुम्हाला स्पष्टपणे सरकारला सांगावे लागेल. जर तुम्ही ते सांगितले नाही तर तुम्हाला आपोआपच म्हणजेच सरकारी भाषेत बाय डीफॉल्ट नवीन कर प्रणाली लागू होईल. तसेच नवीन कर प्रणालीनुसार कर भरावे लागतील.
गुंतवणुकीचे करायचे तरी काय : आता तुम्ही विचाराल की नेमका नवीन कर प्रणाली आणि जुन्या कर प्रणालीमध्ये फरक काय आणि आम्ही कशाची निवड करायची. तर त्याचेच उत्तर आम्ही देणार आहोत. जुन्या कर प्रणालीनुसार तुम्ही करसवलत मिळवण्यासाठी गृहकर्ज, जीवन विमा म्हणजेच एलआयसी किंवा तत्सम गुंतवणूक, मुलांची शैक्षणिक फी यांचा तपशील दिला की करातून वजावट सवलत मिळत होती. ती वजावट नवीन कर प्रणाली स्वीकारली तर मिळणार नाही.
7 लाख रुपयांचपर्यंत करमाफी : नवीन करप्रणाली तुम्ही स्वीकारली तर करपात्र उत्पन्नाची मर्यादा थेट 7 लाख रुपयांपर्यंत जाईल. म्हणजेच तुमचे उत्पन्न 3 लाखांच्या वर जरी असेल मात्र ते 7 लाख रुपयांच्या आत असेल तर कोणतीही गुंतवणूक केली नाही तरी तुम्हाला एक पैसाही कर भरावा लागणार नाही. पुढील काही वर्षे ते 7 लाखांच्यावर तुमचा पगार जाणार नसेल तर नवीन कर प्रणाली स्वीकारणे तुम्हाला परवडणार आहे. कारण हा पगार तुम्ही तुम्हाला हवा तसा कुठेही आणि कसाही खर्च करू शकता.
अचूक निर्णयासाठी कानमंत्र : एकूणच या सगळ्याचा विचार करता तुमचे उत्पन्न किती आहे. तसेच त्यामध्ये पुढील काही वर्षात सर्वसाधारणपणे किती वाढ होऊ शकते. याचा विचार करुन तुमच्या सोईच्या करप्रणालीची तुम्ही निवड करु शकता. एक कानमंत्र नक्कीच देता येईल तो म्हणजे जर तुमचे उत्पन्न 3 लाखाच्यावर असेल आणि ते पुढील एक-दोन वर्षे 7 लाखांच्या आत राहणार असेल तर नवीन करप्रणाली तुमच्यासाठी नक्कीच योग आहे हे निश्चित.
नवीन कर प्रणालीनुसार 7 लाखांच्या वरील उत्पन्नावरही करप्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या कर प्रणालीच्या तुलनेत कमी कर भरुन तुम्ही राहिलेले पैसे तु्म्हाला हवे तसे खर्च करण्याचा पर्याय निवडू शकता. नवीन कर प्रणालीनुसार तुम्हाला किती कर भरावा लागेल. जुन्या कर प्रणाली नुसार तो किती होता याची संपूर्ण माहिती देणारा तक्ता वर दिलेला आहे. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.