नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या 43 मंत्र्यांमध्ये 36 नवीन चेहरे आहेत. विविध खात्यांची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली आहे. या नव्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत, तरूण, सुशिक्षित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मंत्री कोण आहेत, ते जाणून घेऊयात...
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मंत्री -
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालानुसार, केंद्र सरकारच्या 33 मंत्र्यांवर फौजदारी खटले दाखल आहेत. तर 24 मंत्र्यांवर गंभीर फौजदारी खटले आहेत. गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न इत्यादी खटल्यांचा समावेश आहे. यात गंभीर गुन्हेगारीप्रकरणात सहभागी असलेले नेते पश्चिम बंगाल अलीपूर्दवारचे खासदार जॉन बारिया आहेत. त्याच्याविरोधात 9 खटले दाखल आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर निशीथ प्रमाणिक आहेत. त्यांच्यावर हत्येचा आरोप आहे. निशीथ प्रमाणिक हे बंगालच्या कूच बिहारमधील खासदार आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील पंकज चौधरी आणि चौथ्या क्रमांकावर व्ही. मुरलीधरण हे आहेत.
सर्वांत श्रीमंत मंत्री -
केंद्र सरकारमधील मंत्री कोट्याधीश आहेत. मंत्र्यांची सरासरी मालमत्ता 16.24 कोटी आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने प्रथम त्यांना राज्यसभेवर पाठवले आणि आता नागरी विमान उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपविली आहे. सिंधियाची एकूण मालमत्ता 379 कोटींपेक्षा जास्त आहे. तर पीयूष गोयल दुसर्या क्रमांकावर आहेत. तर तिसर्या क्रमांकावर नारायण राणे आणि चौथ्या क्रमांकावर राजीव चंद्रशेखर आहेत. ही माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून समोर आली आहे.
मंत्र्यांची शैक्षणिक योग्यता -
केंद्र सरकारच्या 12 (15%) मंत्र्यांनी 8 ते 12 पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तर 64 (82%) मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि त्याहून अधिक आहे. 2 मंत्र्यांकडे डिप्लोमा केला आहे. तर 9 मंत्री डॉक्टरेट आहेत. पश्चिम बंगालचे दोन खासदार जॉन बारला आणि निशीथ प्रमाणिक हे 8 वी उत्तीर्ण असून त्यांची शैक्षणिक पात्रता सर्वात कमी आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, राजीव चंद्रशेखर, संजीव बाल्यान यांच्यासह 9 मंत्री डॉक्टरेट आहेत.
मोदी मंत्रीमंडळातील सर्वात तरुण मंत्री कोण?
मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात केवळ 4 मंत्र्यांचे वय 31 ते 40 वर्षे दरम्यान आहे. 22 (28%) मंत्र्यांचे वय 31 ते 50 वर्षे आहे. तसेच 56 (72%) मंत्र्यांचे वय 51 ते 70 वर्षे आहे. बंगालमधील कूचबिहारमधील निशीथ प्रमाणिक हे सर्वात तरुण मंत्री आहेत. 35 वर्षीय निशीथ प्रमाणिक यांना गृह राज्यमंत्री यांच्यासह युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याच यादीमध्ये बंगालच्या बनगाव मतदारसंघातील खासदार शांतनु ठाकूर (38 वर्षे), उत्तर प्रदेशातील मिर्झापूरचे खासदार अनुपिया पटेल (40 वर्षे), महाराष्ट्राच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार भारती प्रवीण पवार (42 वर्षे), हिमाचलमधील हमीरपूर येथील खासदार अनुराग ठाकूर (46 वर्षे) यांचा समावेश आहे.