धर्मशाला Khalistan Support Slogan In Dharamshala : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना ७ ऑक्टोबरला एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाईल. विश्वचषकाचे ५ सामने हिमाचल प्रदेशात होणार आहेत. मात्र विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी धर्मशालामध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया समोर आल्या. धर्मशालेतील एका सरकारी विभागाच्या भिंतीवर खलिस्तानवाद्यांनी स्प्रे पेंटनं 'खलिस्तान झिंदाबाद'चा नारा लिहिल्याचं उघडकीस आलं आहे.
'खलिस्तान जिंदाबाद'च्या लिहिल्या घोषणा : मिळालेल्या माहितीनुसार, विश्वचषक सामन्यापूर्वी वातावरण बिघडवण्यासाठी खलिस्तानवाद्यांनी धर्मशाला इथल्या सरकारी कार्यालयाच्या भिंतीवर खलिस्तानच्या समर्थनार्थ 'खलिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा लिहिल्या. ही माहिती मिळताच कांगडा पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी या घोषणा पुसून काढल्या. यावेळी कांगडा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत शोध सुरू : हे प्रकरण समोर आल्यानंतर कांगडा पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून, त्यासाठी आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले जात आहेत. याशिवाय स्थानिक लोकांचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून सखोल तपास सुरू केला आहे. धर्मशालेतील जलशक्ती विभागाच्या कार्यालयाच्या भिंतीवर काळ्या स्प्रे पेंटनं 'खलिस्तान झिंदाबाद'चा नारा लिहिला होता. तो पोलिसांनी खोडून काढला. कांगडाच्या एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी ही माहिती दिली.
७ ऑक्टोबरला पहिला सामना : एचपीसीए स्टेडियमवर पहिला विश्वचषक सामना ७ ऑक्टोबरला होणार आहे. इथं विश्वचषकाचे एकूण ५ सामने खेळवले जातील. सामन्यापूर्वी धर्मशाळेतील भिंतीवर खलिस्तानच्या समर्थनार्थ नारे लिहिण्यात आल्यानंतर पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कांगडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, जेणेकरुन विश्वचषक सामन्यादरम्यान कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये.
विधानसभेच्या आवारात खलिस्तानी झेंडे फडकवले होते : उल्लेखनीय म्हणजे, या आधीही मे २०२२ मध्ये धर्मशालातील तपोवन इथल्या विधानसभा संकुलाच्या भिंतीवर खलिस्तानवाद्यांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ नारे लिहिले होते आणि खलिस्तानचा झेंडाही फडकावला होता. त्यानंतर कांगडा पोलिसांनी काही खलिस्तानवाद्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली होती.
हेही वाचा :