तिरुवअनंतपुरम : देशातील कोरोना लसींची कमतरता पाहता, केंद्राने लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढावे, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली आहे. कित्येक लस निर्मात्यांचे असे म्हणणे आहे, की ते एखाद्या देशाच्या केवळ केंद्र सरकारसोबतच करार करतील. त्यामुळे पंतप्रधान मोदींना पत्र लिहित त्यांनी हे आवाहन केले. केंद्राने या लसी खरेदी करुन, त्या राज्यांना मोफत द्याव्यात, असेही ते म्हणाले.
आपल्या पत्रामध्ये विजयन म्हणतात, की कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहीम हाच दूरगामी उपाय आहे. यासाठी जर राज्यांनी स्वतः ग्लोबल टेंडर काढून लसी विकत घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना या लसी नेहमीपेक्षा जास्त किंमतीला विकत घ्याव्या लागतील. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेत लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढावे. यामुळे एकूण लसींची संख्या जास्त होऊन, कमी किंमतीला त्या विकत घेता येऊ शकतील. त्यानंतर केंद्राने या लसी सर्व राज्यांना मोफत पुरवाव्यात, आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करावे; असेही त्यांनी म्हटले आहे.
केरळ सध्या कोरोना महामारीला लढा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. मात्र सार्वत्रिक लसीकरण करण्यासाठी लसींच्या तुटवड्यामुळे वेळ लागत आहे. लसींची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, मात्र तुलनेने पुरवठा काहीच नाही; असे विजयन आपल्या पत्रात म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये सध्या २ लाख ७७ हजार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत राज्यात एकूण २० लाख ६२ हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, राज्यात एकूण ७ हजार ३५८ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
हेही वाचा : 'एवढी साधी गोष्ट केंद्राच्या लक्षात येत नाही'; राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल