हैदराबाद (तेलंगणा) - पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तीन वेळा हैदराबादला भेट दिली. मात्र, या तिन्ही वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना भेटण्याचे टाळले. त्यांचे स्वागत केले नाही. यंदाही केसीआर यांनी पंतप्रधान मोदी यांना टाळल्याचे दिसून आले. त्यांच्याऐवजी आज तेलंगणाचे मंत्री तलासनी श्रीनिवास बेगमपेट विमानतळावर मोदींचे स्वागत करणार आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हैदराबादमध्ये संत रामानुजाचार्य यांच्या भव्य पुतळ्याचे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे अनावरण करण्यासाठी पंतप्रधान तेलंगणात आले होते. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री राव 'अस्वस्थ' असल्याने ते पंतप्रधानांचे स्वागत करू शकले नाहीत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्री केसीआर पंतप्रधानांना टाळत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यंदाही असेच काही दिसून येत आहे.
मे महिन्यात पंतप्रधान मोदी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 20 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हैदराबादला आले होते. पण, मोदी येथे येण्याच्या काही तास अगोदरच सीएम केसीआर बेंगळुरूला रवाना झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्याशी भेट झाली नव्हती. या दिवशी केसीआर यांनी कर्नाटकच्या राजधानीत माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री कुमारा स्वामी यांची भेट घेतली आणि राष्ट्रीय राजकारणावर चर्चा केली.
पण यावेळी केसीआर आजारी किंवा व्यस्त नाहीत. विरोधी पक्षांच्या वतीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणाऱ्या यशवंत सिन्हा यांचे आज स्वागत करण्यासाठी ते बेगमपेट विमानतळावर गेले होते. राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारासाठी यशवंत सिन्हा हैदराबादमध्ये आले आहेत. सीएम केसीआर आणि मंत्री केटीआर आणि इतर टीआरएस नेत्यांनी बेगमपेट विमानतळावर जाऊन सिन्हा यांचे स्वागत केले. त्यानंतर ते टीआरएस कार्यकर्त्यांच्या मोठ्या दुचाकी रॅलीसह जलविहारला गेले होते. जलविहार येथे टीआरएसने सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे. त्यांनी सिन्हा यांचे स्वागत केले. मात्र, पंतप्रधानांचे स्वागत मुख्यमंत्र्यांऐवजी त्यांचे मंत्री करणार आहेत. त्यामुळे, यंदाही मुख्यमंत्री त्यांना टाळत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा - Rat Damaged Canal : उंदरांनी केले कांड.. बांध पोखरून फोडला कालवा.. शेती गेली पाण्याखाली