सागर (मध्य प्रदेश) Kartiki Ekadashi 2023 : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रमाणेच मध्य प्रदेशच्या बुंदेलखंडमध्येही एक विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, हे येथे एका मराठा राणीनं सुमारे २५० वर्षांपूर्वी बांधलं होतं!
सोन्याच्या विटेवर विठ्ठलाची मूर्ती आणली : या मंदिराची विशेष बाब म्हणजे, हे मंदिर अगदी पंढरपूरच्या मंदिराप्रमाणेच बांधण्यात आलं आहे. यासाठी प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची काळजी घेण्यात आली. येथे पुष्य नक्षत्रात सोन्याच्या विटेवर विठ्ठलाची मूर्ती आणण्यात आली होती. आता मंदिराला २५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंदिरावर कलश रोहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील भाविक सहभागी होणार आहेत.
बाजीराव पेशव्यांचा संबंध : येथील राजा महाराजा छत्रसाल यांचा मुघलांशी संघर्ष झाला तेव्हा त्यांनी बाजीराव पेशव्यांकडे मदत मागितली होती. तेव्हा १७२८ मध्ये महंमद बंगश विरुद्ध लढण्यासाठी प्रथम बाजीराव पेशवे यांनी सैन्य पाठवून महाराजा छत्रसाल यांना मदत केली. यानंतर महाराजा छत्रसाल यांची कन्या मस्तानी हिचा बाजीराव पेशव्यांशी विवाह झाला. मृत्यूपूर्वी महाराजा छत्रसाल यांनी त्यांच्या मदतीच्या बदल्यात बुंदेलखंडचा मोठा भाग बाजीराव पेशव्यांच्या स्वाधीन केला. अशाप्रकारे, मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्याचा बराचसा भाग बाजीराव पेशव्यांच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर येथे त्यांनी आपला प्रतिनिधी राज्य करण्यासाठी पाठवला.
राणी लक्ष्मीबाई खेर यांनी बांधलं : स्थानिक राजाच्या राणी लक्ष्मीबाई अंबादेवी खेर या अतिशय दानशूर आणि धार्मिक होत्या. बुंदेलखंडमध्ये अशी अनेक मंदिरं आहेत, जी राणी लक्ष्मीबाई खेर यांनी बांधली होती. यापैकीच एक आहे २५० वर्षांपूर्वी रहलीमध्ये बांधलेलं विठ्ठलाचं मंदिर. या मंदिराच्या स्थापत्यकलेबरोबरच मंदिराची भव्यता आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराशी असलेलं साम्य लोकांना आकर्षित करतं. विशेष बाब म्हणजे, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त भारतात आणि परदेशात स्थायिक झालेले मराठी लोक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात.
उत्तर प्रदेशातून पुजाऱ्यांना आणलं : गेल्या ६ पिढ्यांपासून मंदिराची पूजा करणारे पंडित लक्ष्मीनारायण पुराणिक यांच्या पूर्वजांना राणी लक्ष्मीबाई खैर यांनी उत्तर प्रदेशातून रहलीत आणलं होतं. मंदिराची सर्व व्यवस्था आणि पूजेची जबाबदारी या पुराणिक कुटुंबाकडे होती. परंतु नंतर ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर आता पुराणिक कुटुंब केवळ पूजा करतं. पंडित लक्ष्मीनारायण पुराणिक सांगतात की, पंढरपूर येथे असलेलं विठ्ठलाचं मंदिर आणि सागर जिल्ह्यातील रहली येथे असलेलं विठ्ठलाचं मंदिर अनेक बाबतीत समान आहे.
पंढरपूरच्या मंदिराशी साधर्म्य : पंढरपूरमध्ये भगवान विठ्ठल विटेवर विराजमान आहेत. रहलीतही भगवान विठ्ठल विटेवरच विराजमान आहेत. पंढरपूर येथे असलेलं मंदिर भीमा (चंद्रभागा) नदीच्या काठावर आहे. मंदिराजवळील नदीच्या वळणाच्या प्रवाहामुळे येथील नदीला चंद्रभागा म्हणतात. रहलीमध्ये असलेलं मंदिर देखील सुनार नदीच्या चंद्रकोरीच्या आकाराच्या प्रवाहाजवळ बांधलं आहे. पंढरपूरच्या मंदिराचा आकार रथासारखा आहे, तर रहलीच्या मंदिराचा आकारही रथासारखाच आहे. मंदिरात विठ्ठलाशिवाय हनुमान, राधाकृष्ण आणि महादेवाच्या मूर्ती आहेत.
मंदिरात भगवान विष्णूचे १२ अवतार कोरले : रथाच्या आकाराच्या मंदिरात भगवान विष्णूचे १२ अवतार कोरलेले आहेत. दीपमालिका मंदिराच्या प्रांगणात आहे. मंदिरात तुळशी विवाहासाठी तुळशीचं व्यासपीठ आणि गरुडाची मूर्ती आहे. मंदिराच्या स्थापत्य शास्त्राबाबत असं म्हटलं जातं की, मंदिराची रचना सूर्योदयाचा पहिला किरण विठ्ठलाच्या चरणी पडावा अशा पद्धतीनं करण्यात आली आहे.
अडीचशे वर्षांनंतर कलशरोहण का : मंदिराचे प्रशासक अजित सप्रे सांगतात की, श्रीदेव पंढरीनाथ मंदिर अडीचशे वर्षांपूर्वी बांधून मंदिराच्या शिखरावर कलशाचा आकार तयार करण्यात आला होता, मात्र कलश रोहन करण्यात आलं नाही. आता मंदिराला २५० वर्ष पूर्ण होत असताना त्याच्या स्मरणार्थ मंदिराच्या शिखरावर आणि मंदिर परिसरात असलेल्या सर्व मंदिरांच्या शिखरांवर कलश अर्पण करण्यात येणार आहे. यासाठी लोकसहभागातून २५ ब्रास कलश तयार करण्यात आले. या २५ कलशांपैकी १२ कलश विठ्ठलाच्या मंदिरात आणि उर्वरित कलश संकुलात बांधलेल्या दुसऱ्या देवाच्या मंदिरात बसवले जाणार आहेत. मंदिराच्या शिखरावर असलेल्या कलशाची उंची साडेसात फूट असून त्याचं वजन ५० किलोग्रॅम आहे. १९९९ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता.
हेही वाचा :