हैदराबाद : कार्तिकी एकादशी म्हणजे वैष्णवांसाठी विशेष सोहळ्याचा दिवस असतो. 'विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल'च्या गजरात भक्तांची पाऊलं पंढरपूरच्या दिशेनं चालू लागतात. वर्षभरात एकवीस एकादशी असतात. त्यात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला आगळवेगळं महत्त्व असतं. आषाढी एकादशीला योग निद्रेत गेलेले जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू कार्तिकी एकादशीला जागे होतात. म्हणूनच या एकादशीला 'देवउठी एकादशी' असंही म्हणतात. कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरूवात होते आणि लग्न, मुंज यासाख्या विधींनाही सुरूवात होते. या वर्षी 'कार्तिकी एकादशी' 23 नोव्हेंबरला आहे.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीत काय फरक आहे? दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र मानली जाते. तर उत्तरायण देवांचा दिवस मानला जातो. कर्क संक्रांत आषाढ मासात येते. त्यामुळं आषाढ शुद्ध एकादशी अर्थात आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटलं जातं. या दिवशी देव झोपी जातात, असं धर्मानुसार मानलं जातं. तर कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी देव झोपेतून जागे होतात. म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ असं म्हटलं जातं. नवसृष्टीनिर्मितीच ब्रह्मदेवाचं कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु योग निद्रेत असतात. त्यामुळं चातुर्मासास विष्णुशयन म्हटलं जातं. तेव्हा क्षीरसागरात श्रीविष्णु शयन करत असतात, अशी मान्यता आहे. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानंतर लग्न समारंभांना सुरूवात केली जाते.
कार्तिकी एकादशीत उपवासाला विशेष महत्त्व : कार्तिकी एकादशीला अनेक भक्त दिवसभर उपवास करतात. एकादशीचा उपवास ठेवणं हे आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी वारकरी संप्रदायात उपवासाला देखील विशेष महत्व दिले जाते. तसेच एकादशीला केलेला उपवास दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात. चातुर्मासचा शेवटचा दिवस मानला जातो. संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत नामदेव यांसारख्या संतांनी आपल्या शेतात किंवा आपल्या कामातच विठूराया शोधला. आपल्या कामात विठ्ठल शोधा अशी शिकवण त्यांनी दिली. त्यामागचं महत्व पटवून दिले. या निमित्तानं काही वारकरी पालख्या घेऊन पंढरपुरात दाखल होतात. काहींना पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं शक्य होत नाही ते भाविक जवळच्या विठ्ठल मंदिराला जाऊन भेट देवून विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतात.
डिस्क्लेमर : (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
हेही वाचा :