धारवाड (कर्नाटक) : कर्नाटक सरकारच्या युवक सेवा आणि क्रीडा विभागाने एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या योगथॉन 2023 कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. राज्याचे क्रीडा मंत्री के सी नारायण गौडा यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील वेगवेगळ्या 33 ठिकाणी एकाच वेळी 4,05,255 हून अधिक लोकांनी योगासने केली, ज्यामुळे पूर्वीचे सर्व विक्रम मोडून नवीन गिनीज विक्रमाची नोंद झाली आहे, असे त्यांनी येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
14 लाख लोकांनी नावे नोंदवली होती : योगासनांचे विशेष आयोजन करण्यासाठी राज्याच्या युवक सेवा व क्रीडा विभागाने गेल्या आठ महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. धारवाडमध्ये 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा एक भाग म्हणून योगथॉनचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील सुमारे 14 लाख योगी आणि योगप्रेमींनी आपली नावे नोंदवली होती.
या-या ठिकाणी झाले योगासने : धारवाड कृषी विद्यापीठाच्या मैदानावर 5,904 हून अधिक, कर्नाटक विद्यापीठाच्या मैदानावर 3,405, आर एन शेट्टी जिल्हा स्टेडियमवर 4,769, विद्यागिरी JSS महाविद्यालयाच्या मैदानावर 3,769 आणि हुबळी रेल्वे क्रिकेट मैदानावर 6,076 हून अधिक उत्साही योगप्रेमी सहभागी झाले होते. धारवाड जिल्ह्यातील 5 ठिकाणच्या एकूण 23,923 जणांनी एकाच वेळी योगासने केली.
कर्नाटकने राजस्थानचा विक्रम मोडला : यावेळी कर्नाटकने राजस्थानचा पूर्वीचा विक्रम मोडला. 2018 मध्ये राजस्थानमधील विविध ठिकाणी 1,00,984 हून अधिक लोकांनी एकाच वेळी योगासने केली होती, ज्याची त्यावेळी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. या आधी 2017 मध्ये कर्नाटकातील म्हैसूर शहरात 55,524 लोकांनी एकाच वेळी योगासने करून गिनीज रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते. मंत्री के सी नारायण गौडा यांनी माहिती दिली आहे की, राजस्थानमध्ये योग करणाऱ्यांपेक्षा तिप्पट लोकांनी शिस्त आणि नियमांचे पालन करून एकाच वेळी योगा केला.
विजयपुरा येथील योगाथॉन : जिल्हा प्रशासन, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाच्या वतीने शहरातील सैनिक शाळेच्या मैदानावर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त योगाथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह २५ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. सैनिक शाळेच्या मैदानात योगासनासाठी एकूण 9 ब्लॉक करण्यात आले. प्रत्येक ब्लॉकमध्ये सुमारे 2 हजार योगींनी योगासने केली. योग पटू बसनागौडा होराना यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार रमेश जिगाजीनागी यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले, 'योग हे शरीराचे आरोग्य राखण्यासाठी पूरक आहे. केंद्रातील आधीच्या सरकारांनी याची काळजी केली नाही. मात्र नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी योग दिन साजरा करण्यासाठी जागतिक संघटनेकडे प्रस्ताव सादर केला आणि आता संपूर्ण जग योग दिन साजरा करत आहे ही अभिमानाची बाब आहे.
हेही वाचा : Record Yogathon in Karnataka : जगातील सर्वात मोठ्या योगाथॉनचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन