नवी दिल्ली : 20 मे रोजी होणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसने गुरुवारी समविचारी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, हेमंत सोरेन, सीताराम येचुरी यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह इतर नेत्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहे.
20 मे ला होणार शपथविधी : निमंत्रित इतर विरोधी नेत्यांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह गांधी कुटुंबीयही उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. राजभवनच्या सूत्रांनी सांगितले की, शपथविधी सोहळा 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता बेंगळुरू येथे होणार आहे.
राज्यपालांशी केली फोनवर चर्चा : या संदर्भात काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सिद्धरामय्या यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि शपथविधीच्या तारखेबाबत चर्चा केली. 10 मे रोजी झालेल्या 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 66, जनता दल (धर्मनिरपेक्ष) 19 जागांवर विजय मिळवला आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनेक दिवसांपासून राष्ट्रीय राजधानीत तळ ठोकून असलेले सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार आज संध्याकाळी बेंगळुरूला पोहोचले. यानंतर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. बराच विचारविनिमय केल्यानंतर, काँग्रेसने गुरुवारी जाहीर केले की पक्षाचे नेते सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.
हेही वाचा -