मंगळुरू (कर्नाटक) : मंगळुरूचे भारतीय जनता पक्षाचे खासदार नलिन कुमार कटील (BJP MP Nalin Kumar Kateel) यांच्या एका विधानाने नविन वादाला तोंड फुटले आहे. (BJP MP Nalin Kumar Kateel Statement on love jihad). "पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, रस्ते आणि सांडपाणी समस्यांवर नाही", असे कटील म्हणाले आहेत. मंगळुरू येथे सोमवारी 'बूथ विजया अभियाना'मध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना लोकसभा खासदाराने हे विधान केले.
पीएफआयवर बंदी घातल्याने राष्ट्राचा फायदा झाला : या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले, "रस्त्यांची कामे आणि गटार विकास यासारख्या छोट्या मुद्द्यांवर बोलू नका. भाजप सरकारने सत्तेवर येऊन लव्ह जिहाद थांबवला पाहिजे. हा तुमच्या मुलांच्या जीवनाचा प्रश्न आहे. पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) वर बंदी घातली नसती तर भाजपचे नेते टिकले नसते. त्यांच्या फोटोंना आत्तापर्यंत पुष्पहार घातला गेला असता. पीएफआयवर बंदी घातल्याने राष्ट्राचा फायदा झाला. हे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केले आहे. अन्यथा हिंदूंच्या हत्याकांडाची मालिकाच घडली असती," असे ते म्हणाले. "देशात 2014 पासून एकही बॉम्बस्फोट झालेला नाही. देशात अमित शहा यांचे सरकार आणि कर्नाटकात बसवराज बोम्मई यांचे सरकार हेच उत्तर आहे. गोहत्येवर बंदी घालणारे भाजप सरकार लव्ह जिहादविरोधातही कायदा आणणार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस सत्तेत आल्यास लव्ह जिहाद वाढेल : कटील यांनी कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "डीके शिवकुमार मुख्यमंत्री झाले तर दहशतवादी रस्त्यावर येतील. जर काँग्रेस सत्तेत आली तर ते कुकर बॉम्ब फोडणाऱ्यांना सोडतील. ते पीएफआयवरील बंदी परत घेतील. काँग्रेस सत्तेत आल्यास लव्ह जिहाद वाढेल. धर्मांतराविरोधातील कायदेही ते मागे घेतील. गोहत्या सुरूच राहणार. नवे कर्नाटक हवे की दहशतवादाची भूमी, हे आता राज्यातील जनतेने ठरवायचे आहे," असेही ते म्हणाले.
काँग्रेसने नलिन कुमारला फटकारले : डीके शिवकुमार यांनी खासदार नलिन कुमार कटील यांच्या लव्ह जिहादच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "कटील यांच्या विधानावर काही आश्चर्य वाटत नाही. भाजपचे प्राधान्य विकास किंवा रोजगार कधीच नव्हते. किमान पक्ष आता याबाबत प्रामाणिक आहे. काळजी करू नका, कर्नाटकचे लोक भाजपला लवकरच सांगतील की त्यांच्या मनात काय आहे".