श्रीनगर - दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत सैन्यदलाच्या ज्यूनियर कमिशन्ड ऑफिसरला वीरमरण आले आहे. ही चकमक जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात गुरुवारी झाली आहे. चकमकीत दहशतवाद्यालाही ठार केल्याचे सैन्यदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
थनामंडी बेल्टमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहिम सुरू केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्याने शोधमोहिमेला चकमकीचे स्वरुप प्राप्त झाले.
हेही वाचा-...म्हणून माध्यमांना संबोधित करताना काँग्रेसच्या महिला खासदाराला रडू कोसळलं
राष्ट्रीय रायफल्सचे ज्यूनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) यांना चकमकीदरम्यान गोळी लागली. त्यांना तातडीने नजीकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रावर नेण्यात आले. मात्र, जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू येथील संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट देवेंद्र आनंद यांनी दिली.
हेही वाचा-धक्कादायक! ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याचे तालिबानला समर्थन
दहशतवाद्याचाही चकमकीत मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. राजौरीचे पोलीस अधीक्षक शीमा नबी कसबा यांनी चकमक सुरू असल्याचे सांगितले. ऑगस्टमध्ये राजौरीत दहशतवादी आणि सुरक्षा दलामधील दुसरी चकमक आहे. सुरक्षा दलाने थलामंडी बेल्टमध्ये 6 ऑगस्टला लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.
हेही वाचा-विषेष मुलाखत- अविनाश धर्माधिकारी, आता भारतातही दिसेल तालिबानी दहशतवाद
सुरक्षा दलाने चालू वर्षात 89 दहशतवाद्यांना केले ठार
जम्मू-काश्मीरमध्ये चालू वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी सात पाकिस्तानी नागरिकांसह 89 दहशतवाद्यांना ठार केले आहे. ही माहिती लष्कर आणि पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परंतु यावर्षी अधिक कमांडर मारले गेले, असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी नुकतेच सांगितले होते.