राजौरी/जम्मू: जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा असलेले पाकिस्तानी ड्रोन पाडले आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू आहे. अधिकृत सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ड्रोनला जोडलेल्या पॅकेटमधून एके रायफलची काही मॅगझिन, रोख रक्कम आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नियंत्रण रेषेला लागून असलेल्या बेरी पाटण आणि सेयोत भागात हवेत एक संशयास्पद वस्तू दिसली, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईत एक ड्रोन पाडण्यात सुरक्षा दलांना यश आल्याचे त्यांनी सांगितले.
विविध प्रकारचे साहित्य जप्त -सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या वस्तूंपैकी एक एके रायफल, एक सीलबंद बॉक्स आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. या भागातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात असून आणखी काही जप्ती अपेक्षित असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही फक्त एवढेच सांगू शकतो की ड्रोन यशस्वीरित्या पाडण्यात आले आहे. त्यातून विविध प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती नंतर शेअर केली जाईल.
ड्रोन पाठवून घुसखोरीचा प्रयत्न- गुरुवारी एका निवेदनात, संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 12-13 एप्रिल 2023 च्या मध्यरात्री, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या समन्वयाने भारतीय सैन्याच्या सतर्क जवानांनी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला गोळीबार करून पाडले आहे. राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमधील बेरी पट्टण भागात एक ड्रोन जप्त करण्यात आला आहे. प्रवक्त्याने सांगितले की, एके-47 च्या 131 राउंड, पाच मॅगझिन आणि दोन लाख रुपये रोख देखील जप्त करण्यात आले आहेत. मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान पाकिस्तानकडून अनेकदा असे ड्रोन पाठवून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येत असतो.
हेही वाचा: माफिया अतिक अहमदच्या मुलाचे पोलिसांकडून एन्काउंटर