नवी दिल्ली - चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची बुधवार (दि. 14 सप्टेंबर)रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील EOW कार्यालयात चौकशी झाली. याप्रकरणी तीची तब्बल आठ तास चौकशी सुरू होती. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली आहे. दरम्यान, तीला उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. वरिष्ठ अधिकारी जॅकलिनच्या उत्तरांवर चर्चा करतील, त्यानंतर ते पुन्हा चौकशीसाठी बोलावायचे की नाही याचा निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.
दोनदा चौकशीसाठी बोलावले होते - मिळालेल्या माहितीनुसार, आधी पिंकी इराणी आणि जॅकलिनचे वेगवेगळे जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर समोरासमोर बसून दोघांची चौकशी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनने चौकशीदरम्यान काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. अनेक प्रश्नांवर इराणी आणि जॅकलिनची उत्तरे जुळत नाहीत अशी माहिती समोर आली आहे. याआधीही दिल्ली पोलिसांच्या EOW शाखेने जॅकलिनला दोनदा चौकशीसाठी बोलावले होते (१२ सप्टेंबर आणि २९ ऑगस्ट), मात्र जॅकलिन पोलिसांसमोर हजर झाली नाही. तिसरे समन्स जारी करत दिल्ली पोलिसांनी अभिनेत्रीला हजर राहण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ती आज हजर झाली होती.
जॅकलीनला सुकेशबद्दल माहिती होती - ईडीने 215 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे. सुकेश चंद्रशेखरने तिला सुमारे 7 कोटी रुपयांचे दागिने गिफ्ट केल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. याशिवाय सुमारे 9-9 लाख रुपये किमतीच्या 3 पर्शियन मांजरी, सुमारे 52 लाख रुपये किमतीचा एक अरबी घोडा, 15 जोड्या कानातल्या, म्हणजे कॉइल, डायमंड सेट, मौल्यवान क्रॉकरी, गुच्ची आणि चॅनेलसारख्या महागड्या ब्रँडच्या डिझायनर बॅग्ज, दोन गुच्ची पोशाख, लुई व्हिटॉन शूजच्या अनेक जोड्या, दोन हमी ब्रेसलेट, एक मिनी कूपर कार, घालण्यासाठी महागडी रोलेक्स घड्याळे भेट दिली आहेत अशीही माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर जॅकलिनचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, जॅकलिनला सुकेशच्या काळ्या कारनाम्यांची माहिती होती. परंतु, तरीही तिने त्याच्या महागड्या भेटवस्तू स्वीकारल्या आहेत.
जॅकलिन देश सोडून जाऊ शकत नाही - ईडीच्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनवरील आरोप योग्य आहेत की नाही आणि त्यानंतरच खटला पुढे चालवला जाईल. सध्या जॅकलिनला परदेशात जाण्याची परवानगी नाही. ईडीने सांगितले, की सुकेश चंद्रशेखर यांनी डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यापूर्वी त्यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही. यापूर्वी जॅकलीनने आरोप केला होता की, सरकारी कार्यालयातील कोणीतरी तिला सुकेश चंद्रशेखरशी संपर्क साधण्यास सांगितले होते. पण त्यानंतर ती सुकेशला सुकेश चंद्रशेखर म्हणून नाही, तर शेखर रत्नवेला म्हणून ओळखत आहे.