श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये गुरुवारी पहाटेपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कानिगाम परिसरात काही दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली.
एक दहशतवादी शरण..
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-बद्र दहशतवादी संघटनेमध्ये नव्यानेच भरती झालेले चार जण या परिसरात लपून बसले होते. यांपैकी तौसिफ अहमद नावाचा दहशतवादी पोलिसांना शरण आला असून, इतरांनाही शरण येण्यासाठी आवाहन केले जात होते. मात्र, त्यानंतरही चकमक सुरू राहिल्यामुळे गोळीबारात या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
दरम्यान, या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले आहे.