श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल बसस्थानकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. तिथे तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर (सीआरपीएफ) दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात ८ स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्राल बसस्थानक परिसरात सीआरपीएफ जवान तैनात होते. दहशतवाद्यांनी या जवानांना लक्ष्य करण्यासाठी ग्रेनेड हल्ला केला. यात ८ स्थानिक नागरिक जखमी झाले.
ग्रेनेड फुटल्यानंतर बसस्थानक परिसरात खळबळ माजली. तेव्हा दहशतवादी याचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. जवानांनी जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, घटनेची माहिती एसओजी, सेना आणि सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकडींना देण्यात आली आहे. परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी असाच हल्ला केला होता. यात १२ स्थानिक नागरिक जखमी झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना पुलवामाच्या काकपोरा परिसरात घडली होती. दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला होता. यात १२ नागरिक जखमी झाले, त्यासोबत त्या परिसरातील रस्त्यांचे देखील मोठे नुकसान झाले.
हेही वाचा - ताजमहलच्या मिनारांच्या नूतनीकरणाला सुरुवात, चार महिने चालणार काम
हेही वाचा - Breaking News : संपूर्ण देशात कोरोना लस मोफत मिळणार - आरोग्य मंत्री10090374