न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प ( Ivana Trump ) यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली. इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाले. इव्हाना ट्रम्प यांनी 1977 मध्ये डोनाल्ड ट्रम्पशी लग्न केले. 1992 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. माजी पत्नीच्या निधनाची माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले- 'इव्हाना ट्रम्प यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना कळवताना खूप दुःख होत आहे की, न्यूयॉर्क शहरात तिचे निधन झाले आहे.
प्रेरणादायी जीवन - ती एक अद्भुत आणि सुंदर स्त्री होती जिने एक प्रेरणादायी जीवन जगले. इव्हाना ट्रम्प यांना डोनाल्ड ज्युनियर, इवांका आणि एरिक ही तीन मुले आहेत. इव्हाना ट्रम्प यांच्या निधनानंतर ट्रम्प कुटुंबीयांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले. इव्हाना ट्रम्प यांनी आपल्या मुलांना संयम, करुणा आणि दृढनिश्चय शिकविले. इव्हाना ट्रम्प यांचा मृत्यू कसा झाला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पूर्वीच्या चेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट राजवटीत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.
ट्रम्प यांना मोलाची साथ - मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लग्न केल्यानंतर, इव्हाना ट्रम्प यांनी कौटुंबिक व्यवसायात मोठी भूमिका बजावली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत, सिग्नेचर बिल्डिंग, न्यू जर्सी आणि अटलांटिक सिटीमध्ये ट्रम्प ताजमहाल कॅसिनो रिसॉर्ट चालवण्यात इव्हाना ट्रम्प यांचाही मोठा हात आहे. त्यांनी ट्रम्प टॉवरच्या विकासात भागीदाराची भूमिका बजावली. ट्रम्प यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर, त्यांनी ओप्रा विन्फ्रेला 1992 च्या मुलाखतीत सांगितले की, मी यापुढे पुरुषांना माझ्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही. डोनाल्ड ट्रम्प नंतर त्यांनी दोनदा लग्न केले. प्रथम 1995 मध्ये इटालियन उद्योगपती रिकार्डो मॅझुचेलीशी विवाह केला. हे लग्न दोन वर्षेच टिकले. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. नंतर 2008 मध्ये रोसानो रुबिकोंडीशी याच्याशी इव्हाना यांनी लग्न केले. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, इटालियन मॉडेल आणि अभिनेता रुबिकोंडी इव्हानापेक्षा 20 वर्षांनी लहान होता.