बेंगळुरू : इस्रोचे चांद्रयान 3 आता हळूहळू चंद्राच्या जवळ पोहचतंय. 23 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. चांद्रयान 3 लँडर मॉड्यूलचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सध्या चंद्राच्या 113 किमी बाय 157 किमीच्या कक्षेत आहे. या वर्षी 14 जुलै रोजी यानाचे प्रक्षेपण झाले होते.
चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंग दरम्यानचे प्रमुख अडथळे
- चंद्राच्या वर 100 किमी पर्यंत कोणतेही वातावरण नाही. त्यामुळे पॅराशूट सहजतेने खाली येऊ शकत नाही.
- चांद्रयान 2, 30 किमी ते 100 मीटर उंचीच्या दरम्यान फेल झाले होते. लँडर चंद्राच्या 2.1 किलोमीटर कक्षेत आले होते, मात्र सॉफ्टवेअर त्रुटीमुळे त्याचा वेग नियंत्रित करू शकला नाही. यावेळी त्याचा वेग नियंत्रित ठेवावा लागेल.
- 100 मीटरच्या उंचीवर, चांद्रयान 3 लँडर विक्रमला अनपेक्षित आणि अचानक बदलांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी येऊ शकतात.
- लँडिंग दरम्यान, चंद्रकण हवेत उडतील. यामुळे सेन्सर त्रुटी आणि थ्रस्टर बंद होण्याचा धोका होऊ शकतो. लँडिंगचा वेग कमी झाल्यानंतरही चंद्राच्या कणांचा धोका कायम राहील. कण लँडरच्या कॅमेऱ्याच्या लेन्सला अस्पष्ट करू शकतात.
सुरक्षित लँडिंगसाठी अंतराळ यानाची दिशा महत्त्वपूर्ण : इस्रोच्या अध्यक्षांच्या मते, चांद्रयान 3 अंतराळ यानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी अंतराळ यानाची दिशा महत्त्वपूर्ण असेल. इस्रोच्या अध्यक्षांच्या मते, चांद्रयान ३ हे व्हर्टिकल असायला हवं, कारण ते या ठिकाणी जवळपास ९० अंशांनी झुकलं आहे. लँडिंग प्रक्रियेचा प्रारंभिक वेग 1.68 किमी प्रति सेकंदाच्या जवळपास असेल असा दावा त्यांनी केलाय. चंद्रावर सुरक्षित उतरण्यासाठी चांद्रयान ३ ला अनेक टप्प्यांतून व्हर्टिकल स्थितीत नेले जाईल. चांद्रयान 2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर योग्यरित्या करण्यात इस्रोला अपयश आल्यामुळे या पायरीला महत्त्व आहे.
इस्रोची टीम पूर्णपणे सतर्क : इस्रोच्या संचालकांच्या म्हणण्यानुसार, इंधनाचा वापर कमी करणे, अचूक अंतर मोजणे आणि सर्व अल्गोरिदम इच्छेनुसार काम करत आहेत याची खात्री करणे महत्वाचे आहे. इस्रोची टीम पूर्णपणे सतर्क आहे, असे ते म्हणाले. तसेच गणनेत थोडी चूक झाली तरी विक्रम सॉफ्ट लँडिंग करू शकतो, अशी व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले. तीन मीटर प्रति सेकंदापर्यंत लँडिंग वेगामुळे चांद्रयान 3 चे कोणतेही नुकसान होणार नाही, असे इस्रोच्या संचालकांनी सांगितले.
हेही वाचा :