हैदराबाद : १९८३ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी हरवलेल्या बालकांच्या दिवसाची घोषणा केली होती. दरवर्षी बेपत्ता झालेल्या शेकडो मुलांचे स्मरण यादिवशी केले जाते. या दिवसाला सुरुवात होण्याचे कारण ठरला, २५ मे १९७९ रोजी बेपत्ता झालेला अॅटन पॅट्स. अॅटनच्या प्रकरणाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियाचेही लक्ष लहान मुले बेपत्ता होण्याच्या समस्येकडे वेधून घेतले होते.
रीगन यांनी ८३ मध्ये राष्ट्रीय दिन म्हणून घोषित केलेल्या या दिवसाला, २००१मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. त्यानंतर २५ मे हा दिवस जगभरात बेपत्ता बालकांचा दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर पाहुयात भारतातील बेपत्ता बालकांची काय स्थिती आहे..
- नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) दिलेल्या माहितीनुसार, देशात दररोज शेकडो मुले बेपत्ता होतात.
- राज्यनिहाय आकडेवारीनुसार, मध्य प्रदेश २०१६,१७ आणि १८ या तीनही वर्षांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर राहिला आहे. त्यातही सर्वाधिक मुले इंदूरमधून बेपत्ता झाली आहेत.
- क्राईम ब्रँच आणि दिल्ली पोलिसांनी दिलेल्या एका अहवालानुसार, बेपत्ता मुलांमध्ये अधिकतर घरी वाद झाल्यामुळे, आई-वडिलांनी ओरडल्यामुळे, अभ्यासाच्या तणावामुळे पळून जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तसेच, रस्ता हरवल्यामुळे बेपत्ता झालेल्या मुलांचे प्रमाणही अधिक आहे.
कोरोना काळात बेपत्ता मुले..
- कोरोना काळामध्ये लॉकडाऊन आणि त्यामुळे झालेल्या स्थलांतरादरम्यान एकूण ३७४ मुले बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे.
- २०१९मध्ये सुमारे ९० हजार मुले बेपत्ता झाली आहेत. तर, २०२०मध्ये सुमारे ९७ हजार मुले बेपत्ता झाली.
मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे कराल..
- मुलांची कागदपत्रे सांभाळून ठेवा.
- मुलांचा सध्याचा फोटो घरी ठेवा.
- मेडिकल आणि डेंटल रेकॉर्ड्स अप-टू-डेट ठेवा.
- ऑनलाईन सुरक्षेला प्राधान्य द्या.
- मुलांना सांभाळण्यासाठी जर कोणा व्यक्तीला नेमणार असाल, तर त्या व्यक्तीची पूर्ण माहिती करुन घ्या.
- लहान मुलांना गाडीमध्ये वा कुठेही एकटे सोडू नका.
- मुलांना त्यांचे नाव टाकलेले कपडे घालू नका.
- मुलांना त्यांचा पत्ता आणि फोन नंबर पाठ करायला शिकवा.