हैदराबाद - भ्रष्टाचार ही भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला लागलेली कीड आहे. कमी जास्त प्रमाणात सर्वच देशात भ्रष्टाचार पसरलेला आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि लोकशाहीच्या विकासातील भ्रष्टाचार मोठा अडथळा आहे. हे ओळखून संयुक्त राष्ट्र संघनटेने २००५ सालापासून भ्रष्टाचार दिन जागतिक स्तरावर पाळण्यास सुरुवात केली.
भ्रष्टाचार विरोधी जगजागृती करणे हा मुख्य उद्देश
संयुक्त राष्ट्राने ३१ ऑक्टोबर २००३ साली पहिल्यांदा भ्रष्टाचार विरोधी आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद घेतली. त्याचवेळी ९ डिसेंबर हा भ्रष्टाराचारविरोधी दिन ठरविण्यात आला. मात्र, २००५ सालापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचार विरोधी दिवस पाळण्यात येतो. भ्रष्टाचार विरोधी जगजागृती करणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. भ्रष्टाचारातून व्यक्तीची प्रमाणिकता, नितीमत्ता, सचोटी, निष्ठा संपल्याचे दिसून येते. स्वार्थासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी अनेक जण पदाचा, खुर्चीचा गैरवापर करतात. त्यामुळे लोकशाही मुल्यांची किंमतही कमी होते. अस्थिर सरकारे, आर्थिकदृष्या मागासपणा, विकासाची संथ गती, गरीबी, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकल्याणकारी योजगांचा खेळखंडोबा होण्यास भ्रष्टाचार कारणीभूत आहे.
भ्रष्टाचार संपवण्यासाठी काम करणं ही सामूहिक जबाबदारी
भ्रष्टाचार वेगळवेळ्या पद्धतीनं केला जातो. कधी लाच घेऊन, कायद्याचे उल्लंघन करून, निवडणूक प्रक्रियेत अफरातफर करणे, एखाद्याची चूक लपवणे किंवा पैसे देऊन एखाद्याचा आवाज दाबला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिनी ही वाळवी नष्ट करण्यासाठी सर्वांना प्रयत्न करायला हवे. राजकीय नेतृत्व, सरकार, वैधानिक संस्था, विविध दबाव गट या सर्वांनी मिळून काम करण्याची ही वेळ आहे. भ्रष्टाचार विरोधी संस्थांना या निमित्ताने बळकटी देण्याची ही एक संधी आहे. पारदर्शीपणे कारभार होण्यासाठी नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.
प्रत्येकवर्षी जगभरात सुमारे १ ट्रिलियन डॉलर लाच म्हणून दिली जाते. तर सुमारे २.६ ट्रिलियन डॉलर भ्रष्टाचारी हडप करतात. ही रक्कम जागतिक जीडीपीच्या ५ टक्के आहे. विकसनशील देशांत विकासासाठी देण्यात येणारा निधीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो.