नवी दिल्ली - महाराष्ट्र टास्क फोर्सने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यानंतर एम्सनेही यावर शिक्कामोर्बत केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस कोरोनाच्या डेल्टा व्हॅरिएंटवर प्रभावी असल्याचे सांगितले.
डेल्टा व्हॅरिएंटभारतासह 80 देशांमध्ये आढळा आहे. हा व्हॅरिएंट जागतिक पातळीवर 'चिंतेचा विषय' आहे. या व्हॅरिएंटविरोधात लस किती प्रमाणात प्रभावी आहे आणि किती प्रमाणात शरीरात रोगप्रतिक्रार शक्ती वाढवते, याची माहिती लवकरच जारी करण्यात येईल,असे केंद्रीय आरोग्य सचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय संयुक्तपणे जागतिक वेबिनारची योजना आखत आहेत. स्वारस्य असलेल्या देशांना या वेबिनारमध्ये आमंत्रित केले जाणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी भाष्य केले. कोविन अॅपचे अनेकांनी कौतूक केले आहे. या अॅपने स्वतःला एक अतिशय मजबूत, सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म म्हणून स्थापित केले आहे.
काय आहे डेल्टा प्लस व्हॅरिएंट?
भारतात सर्वप्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी. १.६१७.२ या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून विषाणूचा 'डेल्टा प्लस' हा नवा व्हेरियंट तयार झाला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही, हे समजून घेण्यासाठी संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणू हा वारंवार आपले रुप बदलताना दिसून येत आहे. आधी आफ्रिका, मग लंडन आणि अशाच काही देशांनंतर भारतातही या विषाणूचे नवे स्ट्रेन दिसून आले आहेत. भारतातील या स्ट्रेन्सना डेल्टा आणि काप्पा अशी नावं देण्यात आली होती. यामधील डेल्टा स्ट्रेनचा 'डेल्टा प्लस' हा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - कोव्हॅक्सिनची लस ७७.८ टक्के लस कार्यक्षम; तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष