हैदराबाद : बालाजी हॅचरीजचे संस्थापक उप्पलपती सुंदर नायडू यांचे गुरुवारी सायंकाळी शहरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १ जुलै १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे झाला. त्यांचे आई-वडील गोविंदुनायडू आणि मंगममाला हे शेतकरी होते. त्यांचा विवाह पेम्मासानी सुजीवनाशी झाला होता.
नायडू यांनी बॉम्बे व्हेटर्नरी युनिव्हर्सिटीमधून व्हेटर्नरी सायन्सेसमध्ये बॅचलर पदवी पूर्ण केली. त्यांनी चित्तूर, अनंतपूर आणि कृष्णगिरी (तामिळनाडू) जिल्ह्यात सरकारी पशुवैद्य म्हणून काम केले. त्यांनी शेतकऱ्यां सोबत जवळून काम केले. शेतमालाच्या किमतीच्या अनिश्चिततेने ते व्यथित झाले होते कारण त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता.
त्यांना विश्वास होता की जर शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्नाची खात्री दिली तर ते त्यांचे जीवनमान सुधारण्यास सक्षम असतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नायडू यांनी कुक्कुटपालनाची कल्पना मांडली. तसेच सरकारी सेवेचा राजीनामा दिला. आणि 1967 मध्ये पोल्ट्री कंपनी सुरू करुन उद्योजकतेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.
स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देताना नायडूं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. अधिक शेतकऱ्यांना भेटता येत असल्याने त्यांनी पायी प्रवास करणे पसंत केले. त्यांचे पोल्ट्री नेटवर्क विस्तारल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. कोंबडीचे फार्म चालवण्यासाठी ते त्यांचे कौशल्य देत, तसेच कोंबडीची पिल्ले आयात करताना त्यांना आव्हानांना सामोरे जावे लागले होते.
त्यांनी 1972 मध्ये बालाजी हॅचरीजची स्थापना केली ज्यामुळे पूर्वीच्या संयुक्त आंध्र प्रदेशात पोल्ट्री उद्योगात मोठी क्रांती घडवून आणली, तसेच हजारो लोकांना रोजगार दिला. पोल्ट्री क्षेत्रातील योगदानाबद्दल नायडू यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नायडू हे डॉ. बीव्ही राव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणेचे संस्थापक विश्वस्त आहेत.
त्यांनी 'नेक'चे आजीवन आमंत्रित सदस्य, एपी पोल्ट्री फेडरेशनचे स्थायी निमंत्रित सदस्य, आंतरराष्ट्रीय पोल्ट्री सायन्स असोसिएशनचे सदस्य आणि राष्ट्रीय अंडी परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. न्यू जर्सीनेही त्यांच्या योगदानाला पुरस्कार देऊन मान्यता दिली आहे.
यापूर्वी नायडूंनी त्यांच्या गावातील तरुणांना शिक्षणाकडे प्रवृत्त करण्यासाठी नेताजी बालानंद संघाची स्थापना केली होती. गावातील तरुणांसाठी खेळाचे साहित्य देण्याबरोबरच त्यांनी गावात वाचनालय उभारण्यासही मदत केली होती. विद्यार्थीदशेपासूनच नायडू यांना समाजाची सेवा करण्याची आवड होती आणि त्यांच्यात नेहमीच एकतेची भावना होती.