नवी दिल्ली : जूनच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची आर-व्हॅल्यू अधिक असल्याची माहिती चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसनी दिली आहे. आर-व्हॅल्यू म्हणजे एका व्यक्तीपासून इतर व्यक्तींना कोरोना होण्याचा दर. 30 जूनला ही व्हॅल्यू 0.78 होती, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही व्हॅल्यू 0.88 झाली आहे.
हे संशोधन करणाऱ्या पथकाचे प्रमुख सिताभ्रा सिन्हा होते. ते कम्प्युटेशनल बायोलॉजी विभागाचे डीन आणि फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. ते म्हणाले, की दररोज नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवरुन आणि इतर माहितीच्या डेटावरुन हे संशोधन करण्यात आले आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही अधिक काळापर्यंत मोठी राहिली, तर त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. याचाच परिणाम म्हणून तिसरी लाट येऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही आर-व्हॅल्यू वाढलेली पहायला मिळाली होती. जानेवारीच्या (0.93) तुलनेत फेब्रुवारीमधील आर-व्हॅल्यू अधिक (1.02) झाली होती. यातूनच पुढे दुसरी लाट आली. एप्रिलमध्ये हीच व्हॅल्यू 1.31 झाली होती. एप्रिल महिन्याच्या शेवटी ही लाट ओसरली, असं सिन्हा यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण देशाचा विचार करता, दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक कोरोना प्रसाराचा दर हा 9 ते 21 मार्चदरम्यान होता. या काळात आर व्हॅल्यू ही 1.37 होती. पहिल्या लाटेच्या सुरुवातीला हीच व्हॅल्यू 2.5 होती असंही त्यांनी सांगितलं.
दुसऱ्या लाटेमध्ये 9 मे नंतर आर-व्हॅल्यू 1च्या खाली गेली. 15 मे ते 26 जून या काळात ती 0.78 एवढी राहिली. मात्र, आता जुलैमध्ये पुन्हा यात वाढ होताना दिसून येत आहे. ही धोक्याची घंटा असू शकते असं मत सिन्हा यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : IMA warning तिसरी लाट अटळ, राज्यांनी दुर्लक्ष करू नये