नवी दिल्ली Indian Fisherman Died : पाकिस्तानच्या तुरुंगात एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झालाय. २०२१ मध्ये गुजरातच्या कोडिनार तालुक्यातील एका मच्छिमाराला पाकिस्तानी सैन्यानं अटक केली होती. तेव्हापासून तो कराची तुरुंगात बंद होता. ९ ऑक्टोबर रोजी त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला.
मासेमारी करताना पाकिस्तानी पाण्यात प्रवेश केला : भूपतभाई वाला असं या मच्छिमाराचं नाव असून तो गुजरातच्या दुडाणा गावातील रहिवासी होता. पाकिस्तानी अधिकार्यांनी त्याला १२ ऑक्टोबर २०२१ रोजी मासेमारी करताना पाकिस्तानी पाण्यात प्रवेश केल्यामुळं बोटीसह पकडलं होतं. त्यानंतर त्याला कराचीच्या तुरुंगात टाकण्यात आलं. ९ ऑक्टोबर रोजी त्याचं निधन झालं. आता त्याचा मृतदेह लवकरात लवकर घरी पाठवावा, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दोन महिन्यांत दोन मच्छिमारांचा मृत्यू : गेल्या दोन महिन्यांत पाकिस्तानच्या कराची तुरुंगात दोन मच्छिमारांचा मृत्यू झालाय. ६ ऑगस्ट २०२३ रोजी गुजरातच्या उना तालुक्यातील नानावडा गावातल्या जगदीश बामनिया यांचं तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. मृत्यूनंतर तब्बल ४५ दिवसांनी त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी पोहोचलं. आता ९ ऑक्टोबर रोजी भूपतभाई वाला यांचाही पाकिस्तानच्या कराची तुरुंगात मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं कारण समजू शकेल.
कुटुंबीयांची मागणी : कोडिनार शहरात कार्यरत असलेल्या समुद्र श्रमिक सुरक्षा संघाचे अध्यक्ष बाळूभाई सोचा यांनी मृत मच्छिमाराचा मृतदेह तातडीनं त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे. 'जगदीश बामनिया या मच्छिमाराचा मृत्यू झाल्यानंतर ४५ दिवसांनी मृतदेह मिळाला. आता आणखी एका मच्छिमाराचा मृत्यू झालाय. दोन्ही देशांमधील कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून काही दिवसांच्या आता मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करावा', अशी मागणी त्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
हेही वाचा :