नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्ण मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. मात्र, यातच लसीच्या तुडवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर सरकारने कोणतेही लसीकरण धोरण अवलंबले नसल्याची टीका विरोधीपक्षांकडून केली जात आहे. लसीकरणावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
भारत सरकारच्या लसीकरण धोरणामुळे विनाशकारी अशी तीसरी लाट देशात येईल, असे दिसत आहे. मात्र, याची पुनरावृत्ती होऊ दिली जाऊ शकत नाही. भारताला योग्य लस धोरणाची आवश्यकता आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी केंद्राच्या लसीकरण धोरणावर टीका केली होती. केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण असल्याचे ते म्हणाले होते.
लसीकरण रणनीती नोटबंदीप्रमाणे -
केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण असून, त्यात समाजातील दुबळ्या घटकांना लस देण्याची कोणतीच हमी नाही. 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांना मोफत लस नाही. तसेच वितरणाची कोणतीही रणनीती नाही, अशी टीका त्यांनी केली होती. तसेच ही लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगेत लागणार. संपत्ती, आरोग्य आणि जीव गमवणार आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार, असेही राहुल गांधी यापूर्वी म्हणाले होते.
'गंगेने बोलवलं, असे म्हणणाऱ्यांनीच आता माँ गंगेला रडवलं' -
गंगेत मृतदेह आढळल्यावर राहुल गांधींनी केंद्राला लक्ष्य केले होते. गंगेने बोलवलं आहे, असे म्हणणाऱ्यांनीच आता माँ गंगेला रडवलं आहे, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. गंगा नदीच्या किनारी जवळपास 2 हजारांपेक्षा जास्त मृतदेह आढळल्याचे वृत्त शेअर करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा - 'वाचवणारा हा नेहमी मारणाऱ्यापेक्षा मोठा असतो'