नवी दिल्ली - इराण आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्ध सरावात भारतानेही सहभाग घेतला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या नौदल सरावाचे नाव 'इराण-रशिया सागरी सुरक्षा बेल्ट २०२१' असे आहे. हिंद महासागराच्या उत्तर भागात हा सराव चालू आहे.
युद्ध सरावात इतरही देश सहभागी होऊ शकतात
मंगळवारी या युद्ध सरावाला सुरूवात झाली आहे. इराणच्या लष्करातील जहाज आणि रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने या सरावात सहभाग घेतला आहे. रशियन नौदलातील अनेक जहाजे हिंद महासागरात दाखल झाली आहेत. यात आता भारतीय नौदलातील जहाजांनी सहभाग घेतल्याची माहिती अॅडमिरल घोलमेर्झा यांनी दिली. या युद्ध सरावात इतरही देश सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
१७ हजार वर्गमैल परिसरात हा सराव होणार आहे. जहाजातून रॉकेटचा मारा आणि शत्रूला अचूकपणे टिपण्यासाठी सराव होणार आहे. जर एखाद्या जहाजाचे अपहरण झाले तर त्याची सुटका कशी करावी, याचाही सराव तिन्ही देशांचे नौदल करणार आहे.