हैदराबाद - अमेरिकेने जवळजवळ दोन दशकानंतर अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला आणि अल्पावधितच संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक केलेल्या प्रोजेक्टचं पुढे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर तालिबानने यासंदर्भात प्रतिक्रियाही दिली आहे. भारताने अफगाणिस्तानात बांधलेल्या प्रकल्पांना कोणताही धोका नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षात भारताने अफगाणिस्थानमधील अनेक प्रकल्पांच्या पुनर्बांधणी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यादरम्यान, भारताने अफगाणिस्थानात जवळजवळ चार अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक केली आहे. यामध्ये रस्ते धरणं, शाळा आणि अफगाणिस्तान संसदेचा समावेश आहे. तर 2019-2020 आर्थिक वर्षात दोन देशातील व्यापार हा 1.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता.
हेही वाचा - अफगाणिस्तानात महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होण्याची भीती- संयुक्त राष्ट्रसंघाकडून चिंता व्यक्त
भारताने अफगाणिस्तानात बांधलेले प्रकल्प -
- अफगाणिस्तान संसद - राजधानी काबूलमध्ये भारताने 90 दशलक्ष डॉलर्स खर्चून अफगाणिस्तान संसदेचं निर्माण केलं. 2015 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. ही इमारत 100 एकर जागेवर बांधण्यात आली आहे. दरम्यान, 2009 मध्ये या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. तर 2014मध्ये ते पूर्ण करण्यात आले होते.
- सलमा धरण - इराणला लागून असलेल्या हेरात प्रांतातील सलमा धरण हे अफगाणिस्तानातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाद्वारे हजारो कुटुंबांना पाणी आणि वीज पुरवठा होतो. या धरणाची साठवण क्षमता 640 दशलक्ष घनमीटर आहे. या धरणाचे उद्घटान 2016 मध्ये करण्यात आले होते. हे धरण बांधण्यासाठीही भारताने मदत केली आहे. तसेच हे धरण भारत- अफगाणिस्तान मैत्रीचे प्रतिम म्हणून ओळखले जाते.
- स्टोर पॅलेसची पुर्नबांधणी - अफगाण परराष्ट्र कार्यालयात 100 वर्षांपेक्षा जास्त जुने ऐतिहासिक असे स्टोर पॅलेस आहे. 2016 मध्येच भारताच्या मदतीने या पॅलेसची पुर्नबांधणी करण्यात आली होती. याचे उद्घाटनसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 1965 पर्यंत या इमारतीत अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रालायाची कार्यालये होती.
- झरंज-देलाराम महामार्ग - अफगाणिस्तान-इराण सीमेजवळ 218 किलोमीटरचा झरंज-देलाराम महामार्ग बांधण्यातही भारताने अफगाणिस्तानला मदत केली होती. हा महामार्ग सामरिकदृष्ट्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी भारताने 600 कोटी रुपये खर्च केले होते. तर भारताची माजी राष्ट्रपती आणि तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्धटान करण्यात आले होते.
- INSTC - हा एक 7200 किलोमीटर लांबीचा मल्टी-मोड परिवहन प्रकल्प आहे. तसेच हा कॉरिडॉर भारत, इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपमध्ये मालवाहतूक करण्यासाठी अतंत्य महत्त्वाचा आहे.
- आरोग्य सेवा प्रकल्प - 1985 मध्ये भारताच्या मदतीने बांधलेल्या इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर चाइल्ड हेल्थ हे अफगाणिस्तानमधील सर्वात मोठे बालरोग रुग्णालय आहे. तसेच, भारताने बदाखशान, बल्ख, कंधार, खोस्त, कुन्नर, नंगरहार, निमरुझ, नूरिस्तान, पक्टिया आणि पक्तिका या सीमावर्ती प्रांतातही आरोग्यसेवा केंद्रे बांधली आहेत.
हेही वाचा - डिप्लोमॅट्स, दूतावासातील अधिकाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही; तालिबानचे आश्वासन
हेही वाचा - तालिबानचे महिलांना सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन