भोपाळ : ७० वर्षांपूर्वी देशात नामशेष म्हणून घोषित झालेला एक प्राणी आता पुन्हा दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून काही चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत. या नामशेष झालेल्या प्राण्याचे देशात पुन्हा स्वागत करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने चित्त्यांची आयात करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात दक्षिण आफ्रिकेहून काही चित्ते आणण्यात येणार आहेत. या चित्त्यांसाठी वन विभागाने अभयारण्यात विशेष विभागही तयार केला आहे. यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच वन विभागाला निर्देश देण्यात आले होते. नोव्हेंबरअखेर पर्यंत हे चित्ते भारतात येण्याची शक्यता आहे.
७३ वर्षांपूर्वी शेवटचा दिसला चित्ता..
सरगुजा महाराज रामानुशरण सिंग यांचा १९४७मध्ये चित्त्यांसोबत घेण्यात आलेला फोटो, हा भारतातील चित्त्यांचा शेवटचा फोटो मानन्यात येतो. त्यानंतर १९५२मध्ये देशातून चित्ता नामशेष झाल्याचे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले होते.
पहिल्या टप्प्यात आणणार १४ चित्ते..
पहिल्या टप्प्यामध्ये आफ्रिकेहून १४ चित्ते आणण्यात येणार आहेत. या प्रत्येक चित्त्यासाठी आफ्रिकेला १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी २०१०मध्येच हे चित्ते आणण्याची सरकारची योजना होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका याचिकेच्या सुनावणीमुळे हा प्रकल्प रखडला होता. २०२०च्या जानेवारीमध्ये यावरील अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयाने चित्त्यांच्या आयातीला परवानगी दिली.
कुनोच सर्वात योग्य..
वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांनी संपूर्ण अभ्यास केल्यानंतर, कुनो अभयारण्यच चित्त्यांसाठी योग्य राहील असा निष्कर्ष काढला आहे. चित्त्यांच्या राहण्यासाठी तिथे योग्य वातावरण आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील वन्यजीव तज्ज्ञांनीही कुनोमध्ये काही दिवस राहून याबाबतची खात्री करत, या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला.
हेही वाचा : VIDEO : खड्ड्यातून बाहेर काढलेल्या हत्तीचा जेसीबी सोबत पंगा...