मुंबई - उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. यंदा आता या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आम आदमी पार्टीसह ममता बॅनर्जी यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शिवसेनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही रंगत चांगलीच रंगात येणार अस दिसतय. (Goa Assembly Election 2022) शिवसेनेचे येथे फारसे वर्चस्व नाही. (AAP party Goa elections) परंतु, भाजपसह, तृणमूल काँग्रेसला डॅमेज फोर्स करण्याची क्षमता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोव्याच्या राजकारणात भाजप विरोधात शिवसेना
महाराष्ट्रात (2019)च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना युती तुटली. त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामडी घडल्या अन् त्यामधून महाविकास आघाडी तयार करण्यात आली. (NCP President Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांनी दोन दिवसात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथून टाकले. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री पद शिवसनेने आपल्याकडे कायम ठेवले. (Shiv Sena chief Uddhav Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याचे एकमत झाले. राज्यात यानंतर भाजपने महाविकास आघाडीला नामोहरण करण्याची एकही संधी सोडली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जशास तसे उत्तर देत शिवसेनेची ताकद दाखवून दिली. आता गोव्याच्या राजकारणात शिवसेना भाजप समोर उभी ठाकणार आहे.
शिवसेनेला डॅमेज करणार
गोव्यात भाजप, आप, काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, मगोप असे अनेक पक्ष रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे येथील लढत बहुरंगी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून पक्षांतरेही रोज घडत आहेत. भाजपच्या चार आमदारांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे. गोव्यात भाजप विरोधात काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. तर शिवसेना भाषिक मतदारांना हाताशी धरून भाजपला डॅमेज करण्याची शक्यता नाकारता येत नाही
भाजपची डोकेदुखी वाढू शकते
गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून लावण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी जोर लावला आहे. परंतु आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसमुळे काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता शिवसेना नेते संजय राऊत यांनी वर्तविली आहे. हे दोन पक्ष जर गोव्यात राजकारण नसते तर काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवता आली असती, एवढा असंतोष भाजप विरोधात गोव्यात असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. शिवसेना दहा पेक्षा अधिक जागा येथे लढणार असल्याचे संकेत ही राऊत यांनी दिले आहेत. भाजपची यामुळे आता डोकेदुखी वाढणार आहे.
काँग्रेसला वगळून युपीए नाही
देशात भाजप विरोधी पक्षीय मोट बांधण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला. काँग्रेसला बाजूला ठेवत युपीए समांतर आघाडी करण्यासाठी बॅनर्जी आणि शिवसेनेसह राष्ट्रवादीला हाताशी धरले. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यूपीएला यावेळी पर्याय देण्याचे विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी हे विधान खोडून टाकत काँग्रेस व्यतिरिक्त यूपीए होणार नाही अशी तंबी दिली. शिवसेनेने देखील पवार यांच्या वक्तव्याची री ओढली. ममता बॅनर्जी आणि शिवसेनेत यानंतर फूट पडली. भाजपने काँग्रेसला रोखण्यासाठी रणनिती आखली आहे. मोदी आणि भाजप विरोधाच्या मशाली पेटवणाऱ्यांनी यूपीए समांतर दुसरी आघाडी तयार करणे म्हणजेच भाजपचे हात बळकट करण्याचा प्रकार आहे, अशा कानपिचक्या शिवसेनेने ममता बॅनर्जी यांना लगावल्या आहेत. यूपीएला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा सल्ला देखील दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर शिवसेनेने केलेल्या टीकेला गोव्यात त्या कसे प्रत्युत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेकडून आत्मघातकीय पाऊल
महाराष्ट्रात दीर्घकाळ राजकारण केलेल्या शिवसेनेने शेजारच्या गोवा राज्यात मराठी भाषिक असतानाही राजकारण केले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेला गोव्यामध्ये राजकीय वजन निर्माण करावा अशी भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी याकडे लक्ष दिले आहे. गोव्यात तशा अर्थाने शिवसेनेची ताकत नाही. परंतु, भाजपला रोखण्यासाठी शिवसेना गोव्यात प्रयत्न करते. त्या दृष्टिकोनातून त्या प्रयत्नांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी साथ द्यावी, शिवसेनेसोबत आघाडी करावी अशी शिवसेनेची इच्छा आहे. मुळात ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि शहा जोडीला धुळ चारून स्वबळावर सत्ता काबीज केलेली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची अशी स्थिती नाही. तसेच, गोव्यात शिवसेना सत्तेवर येण्याची शक्यता नाही. पण डॅमेज करणारा फोर्स म्हणून शिवसेनेला पाहिलं जातं असताना ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेसोबत युती करावी म्हणून शिवसेनेने त्याला अटकळ घातली आहे. ममता बॅनर्जी यांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून त्यांच्यावर टीका करणे म्हणजे औचित्यभंग करणार आहे. शिवसेनेकडून राजकीय दृष्ट्या आत्मघातकी पाऊल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी इटीव्ही भारतकडे व्यक्त केले.
हेही वाचा - BMC 100 Crore Scam : मुंबई महापालिकेत १०० कोटींचा घोटाळा.. विरोधी पक्षनेत्यांचा आरोप