नवी दिल्ली - राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यावर्षी प्रथमच लडाखमधील चित्ररथ सहभागी होणार आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी रविवारी दिली. लडाखच्या चित्ररथामध्ये लेह जिल्ह्यातील टेकडीच्या शिखरावर असलेल्या थिक्से बौद्ध मठाचे मूर्तिमंत चित्रण करण्यात आले आहे. थिक्से बौद्ध मठ हे राज्यातील प्रसिद्ध प्रर्यटन स्थळ आहे.
5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याला असलेला विशेष दर्जा देणारं घटनेतलं कलम 370 आणि 35A रद्द करण्याचा निर्णय घेतला. या राज्याची पुनर्रचना करून त्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी करण्यात आली होती. 26 जानेवारी रोजी होणार्या पथसंचलनात भारत आपली सैन्य शक्ती दाखवण्याच्या तयारीत आहे. 2021 च्या परेडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि राफळे लढाऊ विमान हे मुख्य आकर्षण ठरतील.
इतर राज्यांचे चित्ररथ -
उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये अयोध्यामधील राम मंदिराची प्रतिकृती दर्शविली जाणार आहे. चित्ररथात शहराशी संबंधित संस्कृती, परंपरा आणि कला देखील प्रदर्शित करण्यात येईल. शिख समाजाचे धर्मगुरू श्री गुरू तेग बहादूर यांच्या अतुलनीय आणि सर्वोच्च बलिदानाची थीम पंजाबचा चित्ररथ दर्शवणार आहे. तर उत्तराखंडच्या चित्ररथात केदारनाथ मंदिराची झलक पाहायला मिळेल.
प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे नाही -
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची परेड मागील वर्षांच्या तुलनेत खूप वेगळी असणार आहे. कोरोना साथीचे सावट या परेडवर दिसेल. जवान मास्क घातलेले दिसतील. गेल्या पाच दशकानंतर पहिल्यांदाच मुख्य पाहुण्याशिवाय प्रजासत्ताक दिनाची परेड होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. मात्र, ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला. यापूर्वी 1952, 1953 आणि 1966 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान प्रमुख पाहुणे नव्हते.