मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सीरमला देणार भेट -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आग लागलेल्या युनिटच्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. आज दुपारी मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील इमारतीला गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मोदी तेजपूर विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाला करणार संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता आसामच्या तेजपूर विद्यापीठाच्या 18 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील.
शरद पवार कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर -

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली व कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारात उभा करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तर सांगलीत शिराळ्याचे आमदार मानसिंग नाईक यांच्या वडिलांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
म्हाडाच्या ५ हजार ६४७ सदनिकांची सोडत -

आज पुणे विभागातील 5 हजार 647 घरांसाठी लॉटरी फुटणार आहे. या लॉटरीत ९२ हजार ३३५ पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत. महत्वाचे म्हणजे यावेळी 68 भूखंडाची ई लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याचे म्हाडाकडून सांगितले आहे. पुणे मंडळाने पुणे, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पातील 5 हजार 647 घरांसाठी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन अर्ज मागवले होते. याला इच्छुकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळेच या लॉटरीसाठी 92 हजार 335 अर्ज सादर झाले आहेत अजित पवार यांच्या हस्ते होणार सोडत.
लसीकरण लाभार्थ्यांशी मोदी साधणार संवाद -

भारतात जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू आहे. पीएम नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून वाराणशीत कोरोना लसीकरणाचे लाभार्थी व कोरोना योद्ध्यांशी संवाद साधणार आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा कार्यकर्त्यांना संबोधित करणार -

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज लखनौत बूथ अध्यक्ष संमेलन, सोशल मीडिया वॉलेन्टियर्ससोबत बैठक आणि प्रबुद्ध जन संमेलनाला संबोधित करतील.
शेतकरी संघटना व केंद्र सरकारमध्ये आज बैठक -

केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवेळी कृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी कायद्यांना स्थगिती देण्यास काही अर्थ नसून, आपण कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले आहे. आता दोन्ही पक्षांमध्ये आज ( २२ जानेवारी) बैठक होणार आहे.
सीरम आगीचे कारण आज होणार स्पष्ट -

सीरम इन्स्टिट्यूटमधील आग आटोक्यात आली आहे. आग कशामुळे लागली नाही हे अद्याप कोणालाही सांगता येणार नाही. आज यासंबंधी तपास सुरू होणार असून आगीचे नेमके कारण आज स्पष्ट होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
गोव्यातील इफ्फी महोत्सवाचा आज सातवा दिवस -

51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे आयोजन पणजी येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 16 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत सुरू राहील. यावेळी जगभरातील 224 चित्रपट या महोत्सवात सामील झाले आहेत.
शेतकरी आंदोलनाचा आज ५८ वा दिवस -

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज ५८ वा दिवस आहे. या कायद्याबाबत शेतकरी व सरकारमध्ये आतापर्यंत नऊ वेळा चर्चा झाल्या आहेत, मात्र यावर तोडगा अद्याप निघू शकलेला नाही.