- अजित पवार आज पंढरपूर दौऱ्यावर..
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (रविवार) पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील त्यांच्यासोबत असणार आहेत. दरम्यान, या दौऱ्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा भाजपासह इतर संघटनांनी दिला आहे. वीजबिल प्रश्नी आक्रमक होत हा इशारा देण्यात आला आहे.
- पश्चिम बंगाल : भाजपा प्रसिद्ध करणार जाहीरनामा..
पश्चिम बंगालमध्ये या महिनाअखेरीस विधानसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात होणार आहे. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हा जाहीरनामा प्रसिद्ध करतील अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर याबाबत जनतेकडून सूचनाही मागवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- केजरीवाल पंजाबमध्ये किसान महासभेला संबोधित करतील..
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज पंजाबमध्ये असणार आहेत. याठिकाणी ते किसान महासंमेलनाला संबोधित करणार आहेत. पंजाबच्या मानसा जिल्ह्यामध्ये या महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते केंद्राच्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करतील. पुढील वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष सज्ज होत आहे. ही महासभादेखील या निवडणुकीच्या तयारीचा भाग असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
- उत्तर भारतात विविध राज्यांमध्ये अतिवृष्टी..
उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, गिलगित-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेश या भागांमध्ये आजपासून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये आज पावसाच्या हलक्या सरी पहायला मिळतील, तर २२ आणि २३ तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच महाराष्ट्रातदेखील काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.