आज शेतकरी दिन..
देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांची आज जयंती आहे. यानिमित्त देशभरात आजचा दिवस किसान दिवस, म्हणजेच शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा २८वा दिवस..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज २८वा दिवस आहे. आज दिल्लीच्या सीमेवरच हे आंदोलन शेतकरी दिन साजरा करणार आहेत.
शेतकरी आज सरकारला देणार उत्तर..
आंदोलन करणारे शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. सरकारने आतापर्यंत जेवढे प्रस्ताव पाठवले होते ते सर्व शेतकऱ्यांनी फेटाळले आहेत. यानंतर आता सरकारने पाठवलेल्या नव्या प्रस्तावाबाबत काय करायचे यासंदर्भात मंगळवारी शेतकरी संघटनांची बैठक पार पडली. या संघटना आपले उत्तर आज सरकारला पाठवतील.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे थाली बजाओ आंदोलन..
उत्तर प्रदेश काँग्रेस आज दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करणार आहे. राज्यातील भाजप खासदारांच्या घराबाहेर थाळ्या वाजवत काँग्रेस हे आंदोलन करणार आहे.
दिल्लीमध्ये पुढील चार दिवस राहणार थंडीची लाट..
पुढील चार दिवस दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे. थंडीची ही लाट आजपासून चार दिवस राहणार आहे. या दिवसांमध्ये दिल्लीतील तापमान हे तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल..
नोव्हेंबर डिसेंबरमध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षांचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल.
२०२१च्या दहावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू..
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. यात नियमित विद्यार्थ्यांना ११ जानेवारीपर्यंत, तर पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार, खासगी आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ ते २५ जानेवारी या कालावधीत अर्ज करता येईल.
पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचे सरकारविरोधी आंदोलन..
पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट हे आपल्या सरकारविरोधी आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करतील. पाकिस्तानचे तेहरीक-ए-इन्साफ सरकार हटवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
दिल्लीतील खासगी रुग्णालयांमध्ये असणाऱ्या आयसीयू खाटांबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी..
दिल्लीमधील खासगी रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये असणाऱ्या खाटांपैकी ८० टक्के खाटा या कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात अशी मागणी दिल्ली सरकारने केली होती. दिल्ली उच्च न्यायालयात आज याबाबत सुनावणी पार पडेल.
ओडिशामधील जगन्नाथ मंदिराचे दरवाजे आज पुन्हा उघडणार..
ओडिशामधील जगन्नाथ मंदिराचे दरवाजे आज भाविकांसाठी पुन्हा उघडण्यात येणार आहेत. यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये केवळ पुरीमधील भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. इतर भाविकांसाठी तीन जानेवारीपासून हे मंदिर उघडण्यात येणार असले, तरी त्यानंतर दिवसाला केवळ ५,००० भाविकच दर्शन घेऊ शकणार आहेत.