मराठा क्रांती मोर्चाची आज पत्रकार परिषद -
पुणे - आज पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर क्रांती मोर्चाच्या नेत्यांची आज होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद आहे.
महाराष्ट्रात तिसरी ऑक्सिजन एक्सप्रेस आज होणार दाखल
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित होण्यासाठी महाराष्ट्राला रेल्वेकडून मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस शनिवारी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामद्ये ५६ मेट्रिक टन द्रवरुपातील ऑक्सिजन (एलएओ) असणार आहे. ही ऑक्सिजन एक्सप्रेस ओडिशामधील अंगूल येथून नागपूरला पोहोचणार आहे.
दिल्लीतील ऑक्सिजन कमतरतेच्या समस्येवर उच्च न्यायालयात सुनावणी -
दिल्लीत ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. यावरून दिल्ली सरकार व केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात 20 हजार नवे कोरोनाबाधित आढळले आहेत तर साडे तीनशे मृत्यू झाले आहेत.
बंगालच्या १८ व्या विधानसभेचे आज पहिले अधिवेशन -
बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंगालच्या 18व्या विधानसभेचे आज पहिले अधिवेशन भरणार आहे. विधानसभेच्या सभापतीची निवडही आज होणार आहे.
आसामचा मुख्यमंत्री कोण ? आज ठरणार
आसामचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज (8 मे) पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. नड्डा यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि राज्यातील मोठे नेते हिमंत बिस्वा सरमा यांना दिल्लीला बोलावले आहे.
मध्यप्रदेश सरकारची आज कोरोना आढावा बैठक -
मध्यप्रदेशमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आढावा बैठक बोलाविली आहे.
आज आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिवस -
आज जागतिक रेड क्रॉस दिवस आहे. शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळवणारे हेन्री ड्युनॉट हे रेडक्रॉस चळवळीचे संस्थापक आहेत. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे 8 मे 1828 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभरात 'जागतिक रेडक्रॉस दिवस' म्हणून साजरा केला जातो.
आज जागतिक प्रवाशी पक्षी दिवस -
आज जागतिक प्रवासी पक्षी दिवस आहे. आंतरराष्ट्री प्रवासी पक्षी दिवस मे महिन्यातील दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. २००६ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय प्रवासी पक्षी दिवस साजरा करण्यात आला होता.
भुवनेश्वर येथे ड्राइव्ह-इन कोविड लसीकरण केंद्र आजपासून सुरू
भुवनेश्वर म्युनिसिपल कॉर्पोरेशन (बीएमसी) शनिवार (08 मे) पासून एस्प्लानेड मॉल येथे ड्राइव्ह-इन कोविड लसीकरण केंद्र सुरू करणार आहे.
कोरोना उपाययोजनांसाठी नागपूर प्रशासनाची 100 कोटींची मागणी, आज पालकमंत्री घेणार आढावा
नागपूर - नागपूर महानगर व ग्रामीण भागातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी आणि आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी राज्य आपत्ती मदत निधीतून (एसडीआरएफ) 100 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे. शनिवारी या संदर्भात ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत कोविड उपायोजना संदर्भातील आठवडाभराच्या उपलब्धतेचा आढावा घेणार आहेत.