केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज वर्धा दौऱ्यावर -
नागपूर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज वर्धा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते शहरातील जेनेरिक लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला भेट देतील. त्याचबरोबर कोविड केअर सेंटरला भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतील.
मराठा आरक्षणप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद -
शिवसेना खासदार आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याने राज्यात निर्माण झालेल्या तनावपूर्ण परिस्थितीवर ते बोलण्याची शक्यता आहे.
भाजपची पत्रकार परिषद -
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याने या विषयावर ते पक्षाचे मत मांडतील.
तामिळनाडूमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी -
डीएमके अध्यक्ष एम के स्टॅलिन यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्याने त्यांनी बुधवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन सरकार स्थापन्याचा दावा केला. शुक्रवारी ७ मे राजी त्यांच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी होणार आहे. स्टॅलिन यांचे निवासस्थान व तामिळनाडूचे राजभवनात आज राजकीय घडामोडी घडणार आहेत. शपथविधीची तयारी व निमंत्रितांची यादी आज तयार केली जाणार आहे.
प. बंगाल नव्या सरकारमधील मंत्र्यांची नावे आज होणार जाहीर -
तृणमूलच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या बैठकीसाठी उपस्थित असतील. नव्या मंत्रिमंडळावर यात चर्चा केली जाऊ शकते. ममतांच्या नव्या सरकारमध्ये महिला व अनुसुचित जातींच्या सदस्यांना मोठ्या प्रमाणात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. साशी पंजा, नयना बंडोपात्र, रत्ना चॅटर्जी, जून मलिआ व लव्हली मोहित्रा आदि महिलांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.
आजपासून हिमाचल प्रदेशात १० दिवसांचा लॉकडाउन -
कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिमाचल प्रदेशात सरकारने बुधवारी १० दिवसांचा लॉकडाउन घोषित केला. गुरुवारी मध्यरात्रीपासून हा लॉकडाउन लागू होईल. १६ मेपर्यंत हा लॉकडाउन असेल.
अमेरिकेचे मदत भारतात होणार दाखल -
भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अमेरिकेने भारताला मोठी मदत केली आहे. अमेरिकेने भारताला ५४५ ऑक्सिजन कंसंट्रेटर, १,६००,३०० एन९५ मास्क, ४५७ ऑक्सिजन सिलिंडर, ४४० रेग्युलेटर, २२० पल्स ऑक्सिमीटर याबरोबरच अन्य सामुग्री पाठवली. अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी दिली आहे. अमेरिकेची ही मदत आज भारतात दाखल होऊ शकते. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आयपीएलविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी -
आयपीएलचा १४ वा सीझन कोरोना महामारीमुळे अर्ध्यावरच रद्द करण्यात आला आहे. देशभरात कोरोनाबाधितांच्या आकडा वाढत असताना ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल खेळले जात होते. त्याविरोधात एच.एस ठाकूर व कपिल कुमार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनामुळे देशात मृतांचा आकडा वाढत असताना आयपीएलचा अट्टाहास कशासाठी असा सवाल बीसीसीआयला करण्यात आला आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अमेरिकेमध्ये आज राष्ट्रीय परिचारिका व प्रार्थना दिवस -
अमेरिकेत आज राष्ट्रीय परिचारिका दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर अमेरिका व नायजेरियात ६ मे हा दिवस प्रार्थना दिवस म्हणूनही साजरा केला जातो.