आज जागतिक मातृदिन -
दरवर्षी, मे महिन्याच्या दुसरा रविवार ही मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मातृदिन 9 मे रोजी साजरा होत आहे. मातृदिन हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला होता. जेव्हा एना जार्विस नावाच्या मुलीने तिच्या आईचे स्मारक बांधले आणि तिला श्रद्धांजली वाहिली. कारण, ती तिच्या आईची शेवटची इच्छा होती. नंतर, तिने आईच्या निधनानंतर तीन वर्षे असेच केले आणि त्यानंतर तिने सर्व मातांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली आणि हा दिवस अमेरिकेत मातृदिन म्हणून साजरा करण्यात आला.
बिहारमध्ये आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू -
बिहारमध्ये आज (९ मे) पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून ज्यांनी कोविन अॅपवर नाव नोंदणी केली आहे. त्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
लालू प्रसाद यादव आज पक्ष कार्यकर्त्यांची घेणार बैठक -
बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आजपासून राजकारणात पुन्हा सक्रिय होत आहेत. लालू यादव यांनी आज पक्षातील १४४ नेत्यांना बैठकीसाठी बोलाविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हर्चुअली असणार आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची कोरोना आढावा बैठक -
मध्यप्रदेशमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आढावा बैठक बोलाविली आहे.
आजपासून भोपाळ शताब्दी, राजधानी एक्सप्रेससह २८ गाड्या रद्द -
भोपाळ शताब्दी एक्सप्रेस 9 मे पासून रद्द करण्यात आली आहे. पर्यटकांची पहिली पसंत असणाऱ्या भोपाळ शताब्दी एक्सप्रेसला मागील एक महिन्यापासून क्षमतेच्या निम्मेही प्रवासी मिळत नव्हते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या कारणामुळे रेल्वे मंत्रालयाने ९ मे पासून राजधानी, शताब्दी सारख्या २८ एक्सप्रेस सेवा पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या आहेत.
आसाममध्ये आज भाजप विधीमंडळ दलाची बैठक, मुख्यमंत्री ठरणार
भाजपने आसाममध्ये जोरदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा सत्ता राखली आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटलेला नाही. आज भाजप विधीमंडळ दलाची बैठक होत असून त्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. हेमंत बिस्वा व सर्बानंद सोनोवाल या दोघांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे.
एम. के. स्टॅलिन कॅबिनेटची आज पहिली बैठक -
तामिळनाडूत सत्तांतर झाल्यानंतर एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे घेतली आहेत. सात मे रोजी मुख्यमंत्री व अन्य ३३ मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडल्यानंतर या नवनियुक्त सरकारमधील पहिल्या कॅबिनेट बैठकीचे आज आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बैठक होईल.
बंगालमध्ये आज भाजप विधीमंडळ नेता निवड -
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद व भाजपचे राष्ट्रीय महासचिव भुपेंद्र यादव यांची बंगालमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. आज बंगाल भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक होत असून यामध्ये ते सहभागी होतील. आज बंगाल भाजपचा विधीमंडळ नेता निवडण्यात येईल.
ऑस्ट्रिया व झेक प्रजासत्ताकमधून ऑक्सिजन भारतात दाखल -
ऑस्ट्रियाहून १९०० ऑक्सिजन कॅन्युलास, ३९६ ऑक्सिजन सिलिंडर आणि झेक प्रजासत्ताकमधून ५०० ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन विमान आज पहाटे भारतात दाखल झाले. आज याचे विविध राज्यांमध्ये वितरण केले जाणार आहे.
दक्षिण स्टार विजय देवरकोंडा व साई पल्लवी यांचा वाढदिवस -
तेलुगु स्टार विजय देवरकोंडा याचा आज वाढदिवस. गीता गोविंदम, डिअर काँम्रेड हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत. त्याचबरोबर मळयालम तारका साई पल्लवी हिचाही आज वाढदिवस आहे. प्रेमम हा तिचा गाजलेला चित्रपट आहे.