मराठा आरक्षणाबाबत सात सदस्यीय समितीची स्थापना -
राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाच्या सर्व बाजूंचा अभ्यास करण्यासाठी सात सदस्यीय समितीचे गठण करण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्षपद एका निवृत्त न्यायाधीशाकडे सोपविण्यात येणार आहे.
पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द केल्याने राज्य सरकारविरोधात आंदोलन -
राज्य सरकारने पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात औरंगाबादमध्ये राज्यातील महाआघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. आंबेडकरी कृती समितीच्या वतीने हे मुंडन आंदोलन केले जाणार आहे. भटकलगेट येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन केले जाणार आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक -
छत्तीसगडमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल या बैठकीत सामील होणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात येईल.
हिमाचल सरकारची कोरोना आढावा बैठक -
मुख्यमंत्री जयराम ठाकूर आज व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. राज्यात कोरोना केसेसमध्ये वाढ होत असल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यासंदर्भात चर्चा केली जाऊ शकते.
आसामच्या मुख्यमंत्रीपदी हेमंत बिस्वा सरमा यांचा आज शपथविधी -
आसामच्या मुख्यमंत्रीपदी हेमंत बिस्वा सरमा यांची वर्णी लागली आहे. रविवारी हेमंत बिस्वा सरमा यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. हेमंत सरमा यांचा आज दुपारी चार वाजता शपथविधी होणार आहे. राज्यपाल जगदीश मुखी त्यांना शपथ देतील.
ममता मंत्रिमंडळातील ४३ मंत्र्यांचा आज शपथविधी -
बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची ममता बँनर्जी यांनी पाच मे रोजी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. ममता यांच्या मंत्रिमंडळातील ४३ मंत्र्यांचा आज शपथविधी कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महिला मंत्र्यांचाही समावेश आहे.
ओडिशात आज वादळ, १९ जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश -
भारतीय हवामान विभागाने ओडिशामध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांना चक्रीवादळ व विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राजस्थान, तामिळनाडू व कर्नाटक राज्यात आजपासून १४ दिवसांचा लॉकडाऊन -
देशात कोरोनाने कहर केला असून दररोज चार लाखांच्या वर कोरोनाबाधितांची भर पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थान, तामिळनाडू व कर्नाटकमध्ये आजपासून १४ दिवसांचा म्हणजे २४ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व सेवा, समारंभ व दुकाने बंद राहणार आहेत.
दिल्ली व हरियाणा सरकारने लॉकडाऊन वाढवला -
दिल्ली व हरियाणामध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आज संपणार होता मात्र राज्यातील कोरोनाची वाढती स्थिती पाहता दोन्ही राज्यातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतची सुधारित नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.
गुजरातहून ऑक्सिजन एक्सप्रेस आज दिल्लीत होणार दाखल -
दिल्लीत कोरोनाने कहर केला असून अनेक रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. गुजरातच्या हपा येथून २२५ मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन रेल्वे आज दिल्ली कँट येथे दाखल होत आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवठा काही प्रमाणात कमी होणार आहे.