नवी दिल्ली - देशातील कोरोना परिस्थिती सध्या गंभीर बनली असून दिवसा २ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. काही राज्यांमध्ये संचारबंदी, जमावबंदी किंवा टाळेबंदीचा पर्याय अवलंबला जात आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेची (काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन) १० वी आणि १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या देशभरात वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 4 मेपासून सुरू होणारी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेचे (सीआयसीएसई) मुख्य कार्यकारी व सचिव गॅरी अरथून म्हणाले.
आम्ही सध्या परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून असून परीक्षा आयोजित करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. इयत्ता १२ वीची परीक्षा नंतर घेण्यात येईल, तर दहावीच्या विद्यार्थ्यांनानंतर ऑफलाइन परीक्षा देण्यास किंवा बोर्डाने विकसित केलेल्या प्रमाणात मूल्यांकन करण्याचे पर्याय असतील, असेही ते म्हणाले.
यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द केल्या आहेत, तर १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.