नवी दिल्ली: आयसीसी पुरुष वनडे वर्ल्डकप २०२३ नेमका कधी होणार या बद्दल सगळ्यांनाच मोठी उत्सुकता आहे. या वर्ल्ड कपचे आयोजन भारत करणार आहे. या विश्वचषकाच्या तारखेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. यापूर्वी 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या वनडे वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंडकडे होते आणि इंग्लंड 2019 मध्ये वनडे वर्ल्डकप चॅम्पियन बनला होता. असा विश्वास आहे की हा वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होऊ शकतो आणि त्याचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाऊ शकतो.
मात्र वनडे वर्ल्डकप अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर का होतोय? याबाबत अद्यापही प्रश्न उपस्थित होत आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक सुमारे एक वर्ष अगोदर जाहीर होते. मात्र यावेळी तसे झाले नाही. आयसीसीला पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि भारत सरकारकडून मिळणारी करमाफी समजून घेण्यासाठी वेळ लागत असल्याचे यामागचे कारण असल्याचे मानले जात आहे.
बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात एक करार झाला होता. यानुसार 2016 ते 2023 या कालावधीत 3 स्पर्धांसाठी डावपेचांमध्ये सूट देण्याचे सांगण्यात आले होते. ईएसपीएन क्रिक इन्फो च्या अहवालानुसार, 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्डकप 2023 खेळवला जाणार आहे. यासोबतच या विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याचे मानले जात आहे. यासोबतच या अहवालात असेही म्हटले आहे की, या वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एकूण 12 ठिकाणांची निवड केली आहे.
अहमदाबाद व्यतिरिक्त, या 12 ठिकाणांमध्ये दिल्ली, चेन्नई, धर्मशाला, गुवाहाटी, बेंगळुरू, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, राजकोट, लखनऊ आणि मुंबईचा समावेश आहे. याशिवाय वनडे वर्ल्डकप सराव सामन्यांसाठी बीसीसीआय दोन ते तीन अतिरिक्त ठिकाणेही ठरवू शकते, असे सांगण्यात आले आहे. या विश्वचषकात सुमारे 10 संघ सहभागी होणार असून या संघांमध्ये एकूण 48 सामने होणार आहेत, जे 46 दिवस खेळले जातील.